मल्याळम सुपरस्टार फहाद फासिलने २०२० मध्ये त्याच्या ‘सी यू सून’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य त्याच्या अभिनयातून निवृत्तीनंतरच्या आयुष्याबद्दल होतं. फहादने त्याला निवृत्तीनंतर स्पेनमध्ये उबर ड्रायव्हर व्हायचंय, असं म्हटलं होतं. आता पाच वर्षांनंतरही तो त्याच्या गाडी चालवण्याच्या मतावर ठाम आहे.
द हॉलीवूड रिपोर्टर इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत फहादला त्याचं उबर ड्रायव्हर व्हायचं मत तेच आहे का, असं विचारण्यात आलं. फहाद उत्तर देत म्हणाला, “हो, हो. आम्ही काही महिन्यांपूर्वी बार्सिलोनामध्ये होतो. मी अजूनही त्याबद्दल खूप विचार करतो. मला वाटतं की हे तेव्हाच होईल जेव्हा मी लोकांना स्क्रीनवर नको असेन. खरं तर मला वाटतं की एखाद्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची कल्पना एक खूप सुंदर गोष्ट आहे. कारण तुम्ही एखादा त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचतो त्याचे साक्षीदार असता. आणि मी अजूनही तेच करतो, जेव्हा जेव्हा मला गाडी चालवण्याची संधी मिळते तेव्हा मी गाडी चालवतो. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी गाडी चालवतो आणि ही एक अशी गोष्ट आहे जी मला अजूनही खूप आवडते. तो माझा स्वतःचा वेळ असतो. आणि गाडी चालवताना विचार करणं खूप चांगलं असतं.”
मल्याळम सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट सिनेमे देणारा अष्टपैलू अभिनेता फहाद फासिल खूपच खासगी आयुष्य जगतो. तो सोशल मीडियावर नाही. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांनाही तो क्वचितच हजेरी लावतो. सोशल मीडियावर नसल्यामुळे तरुण पिढीतील प्रेक्षकांबरोबर रिलेव्हंट राहणं कठीण वाटतं का? असा प्रश्न फहादला विचारण्यात आला.
मी वाईट चित्रपट केल्यावर प्रेक्षक दुरावतील – फहाद फासिल
फहाद उत्तर देत म्हणाला, “मी वाईट चित्रपट बनवायला सुरुवात केली की मी प्रेक्षकांपासून दुरावेन. त्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट काहीही मला प्रेक्षकांपासून दूर नेऊ शकत नाही. ज्या क्षणी मी वाईट चित्रपट करेन, त्याच क्षणी लोक माझ्यापासून दूर जातील. जोपर्यंत माझा प्रयत्न प्रामाणिक आहे, असा मला विश्वास आहे तोपर्यंत ते मला स्वीकारतील. किंवा किमान ‘हा माणूस काहीतरी करत आहे,’ असा विचार करतील.”
फहाद फासिल सध्या त्याचा आगामी कॉमेडी-थ्रिलर चित्रपट ‘मारीसन’चे प्रमोशन करत आहे. या चित्रपटात ज्येष्ठ तमिळ अभिनेते वादिवेलु देखील आहेत. कमल हासन यांनी अलीकडेच ‘एक्स’वर या चित्रपटाचे कौतुक केले. हा हसवणारा आणि विचार करायला भाग पाडणारा चित्रपट आहे, असं ते म्हणाले.