कुटुंबावरती चित्रपट करण्यात रंगलेलं कुटुंब अशी खरं तर ‘फॅमिली कट्टा’ या चित्रपटाच्या टीमची ओळख करून देता येईल. अभिनेत्री वंदना गुप्ते आणि राणी वर्मा या दोन बहिणींनी ‘सिस्टर कन्सर्न’ नावाने चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उडी घेतली आहे. ‘फॅमिली कट्टा’ हा त्यांची निर्मिती असलेला पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटामागे जसं वंदना गुप्ते यांचं कुटुंब आहे, तसंच ते चित्रपटातही आहे आणि या चित्रपटासाठी म्हणून स्वत: वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, किरण करमरकर, प्रतीक्षा लोणकर, गौरी नलावडे, अलोक राजवाडे, संजय खापरे ते अगदी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी एवढा मोठा ताफा एकत्र आला आहे. त्यामुळे एका मोठय़ा कुटुंबासारखीच भासणारी ही फौज घेऊन कट्टय़ावरचा मोकळेपणा आणि फॅमिलीतील घट्ट बांधून ठेवणाऱ्या नातेसंबंधांची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी चित्रपटांमध्ये विषयाच्या पातळीवर अनेक प्रयोग होत असताना पुन्हा एकदा कुटुंबाची, नातेसंबंधांची गोष्ट  सांगण्याचा मोह का व्हावा? याहीपेक्षा आपली पहिली चित्रपटनिर्मिती ही अशीच कौटुंबिक नातेसंबंधांविषयी, मूल्यांविषयी बोलणारी असावी अशी इच्छा आपल्या मनात होती. आणि त्याच वेळी प्रशांत दळवींनी लिहिलेली ही कथा अलगदपणे समोर आली आणि त्यावरच चित्रपटनिर्मिती करायचे ठरले, असे वंदना गुप्ते यांनी सांगितले. दिवसेंदिवस यंत्राच्या आणि तंत्राच्या माध्यमातून व्हच्र्युअली एकत्र येणारी मंडळी प्रत्यक्षात आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्याच माणसांपासून तुटत चालली आहेत हे वास्तव आहे. तीन-चार पिढय़ा एकत्र राहणारा एक काळ होता तेव्हापासून बदलत गेलेली कुटुंब संस्कृती नुसतीच विभक्त झाली असं नाही, त्याचा ढाचा बदलला तशी मूल्यंही बदलली. आता मूलच होऊ द्यायचं नाही, असा निर्णय घेण्याइतपत हे बदल खोल आणि वेगळे आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पुन्हा एकत्र कुटुंब पद्धतीत राहा, असा सल्ला देण्यात हशील नाही. मात्र हे बदल जे झालेत ते आपल्या एकमेकांशी हरवत चाललेल्या संवादातून आहेत, एकमेकांपासून तुटत चालल्यामुळे आहेत, याची जाणीव महत्त्वाची आहे. म्हणूनच कुटुंबाची गोष्ट सांगतानाही त्याला कट्टा जोडलेला आहे, कारण क ट्टय़ात तो मोकळेपणा असतो. तिथे आपण मुद्दामहून मन मोकळं करण्यासाठी येतो. ‘फॅ मिली कट्टा’ या चित्रपटात पन्नास र्वष पूर्ण झालेल्या आजी-आजोबांच्या निमित्ताने हा कट्टा जोडलेला आहे, असे कुलकर्णी म्हणतात.

या चित्रपटातील आजी-आजोबा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून संपूर्ण कुटुंबाला एकत्र बोलावतात. मात्र इथे हे आजी-आजोबा गरीब बिच्चारे नाहीत. त्यांना कोणीही टाकून दिलेलं नाही. ते निवृत्त आहेत, मजेने स्वत:चे आयुष्य जगत आहेत. त्यांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारे एकटेपणा नाही आहे. पण आपली मुलं- नातवंडांची पिढी बिच्चारी झाली आहे, असं त्यांना वाटतं. त्यांना एकत्र आणण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. आपल्या नेहमीच्या शैलीप्रमाणे एका वास्तव घटनेचा आधार घेऊन त्याभोवती ही नात्यांची गोष्ट प्रशांत दळवी यांनी लिहिली असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. या चित्रपटात सई ताम्हणकर, अलोक राजवाडे, प्रतीक्षा लोणकर अशी स्वत:ची वेगळी ओळख असलेली, वेगवेगळ्या शैलीच्या चित्रपटांमधून काम करणारी मंडळी एकत्र आली आहेत. त्यामुळे एकाच फ्रेममध्ये असे वेगवेगळे अभिनयाचे रंग एकत्र यावेत, अशा प्रकारची अनुभूती हा चित्रपट देतो. ‘दिलीप प्रभावळकर आणि मी आम्ही दोघंच इतके उमदे कलाकार आहोत की आम्हाला शोभतील अशीच कलाकार मंडळी आम्ही घेतली आहेत’, अशी मिश्कील टिप्पणी वंदना गुप्ते यांनी जोडली. पण एवढे सारे चांगले कलाकार एका चित्रपटात एकत्र येणे यामुळे चित्रपटाची निम्मी लढाई जिंकल्यात जमा आहे हे दिग्दर्शक आणि निर्माता या दोघांनीही मान्य केले. आणि चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर प्रत्येक कलाकाराने कुठलेही आढेवेढे न घेता ताबडतोब होकार देऊन काम केले, हा अनुभवही पहिल्यांदाच निर्माती म्हणून उतरलेल्या आपल्यासाठी सुखद ठरल्याचेही वंदना गुप्ते यांनी सांगितले.

चित्रपटाच्या निमित्ताने तीन पिढय़ांचे चित्रण करण्यात आले आहे. स्वत: वंदना गुप्ते यांनी वास्तव आयुष्यातही आपल्या कुटुंबालाच अशा पद्धतीने एकत्र सांभाळले आहे. या तीन पिढय़ांमध्ये आत्ताची तरुण पिढी आपल्याला जास्त भावते, असे त्या म्हणतात. तरुण पिढीचा सळसळता उत्साह हा आपल्याला प्रेरणादायी वाटतोच, मात्र त्यांना जशी नव्याची ओढ आहे तसंच त्यांना आपली मूळंही तपासून पाहायला आवडतात. आपले नातेवाईक, आपले घर, आपला इतिहास समजून घेण्यात त्यांना रस असतो, ते शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांना जुन्याशी आणि नव्याशीही जोडलेलं राहायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे, असं सांगतानाच मात्र ते जोडलेलं राहण्यासाठी केवळ सोशल मीडिया, मोबाइलच्या मागे धावता धावता ही पिढी वास्तवापासून दूर जाण्याची भीती असते, त्यांच्यात उथळपणा येतो तिथे त्यांना सांभाळणं गरजेचं वाटत असल्याचंही वंदना गुप्ते यांनी सांगितलं. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक नातेपैलू, त्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे त्यामुळे हा चित्रपट पाहणाऱ्या  कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हा चित्रपट आपलासा वाटेल, असा विश्वास दिग्दर्शक म्हणून चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

‘अमिताभ यांना ‘फॅ मिली कट्टा’ दाखवायची इच्छा अधुरी..’

‘फॅमिली कट्टा’मध्ये आणखी एक वेगळा कलाकार दिसणार आहे तो म्हणजे संगीतकार आदेश श्रीवास्तव. दुर्दैवाने, हा चित्रपट पूर्ण होण्याआधीच त्यांचे निधन झाले. या चित्रपटासाठी आदेश श्रीवास्तव यांची भेट घ्यायला गेलो तेव्हा चित्रपटाच्या संगीताचे काम करायचे असेल, असे त्यांना वाटले होते. मात्र चित्रपटात भूमिका करण्याविषयी त्यांना विचारले तेव्हा त्यांना धक्काच बसल्याची आठवण कुलकर्णी यांनी सांगितली. मला अभिनय करता येत नाही, शिवाय मराठीही येत नाही.. असे म्हणणारे आदेश श्रीवास्तव चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून सेटवर रमले होते. किंबहुना, सेटवर सगळ्यात आधी पोहोचणारे ते असायचे, असे वंदना गुप्ते यांनी सांगितले. आदेश श्रीवास्तव यांचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याशी अगदी जवळचे संबंध होते. आपण मराठी चित्रपटात काम करत असल्याचे त्यांनी बच्चन यांना सांगितले होते. शिवाय, या चित्रपटाची भरपूर तारीफही त्यांनी केली होती. तुम्ही हा चित्रपट पाहायलाच हवा, असे आदेश त्यांना नेहमी सांगायचे. त्यांच्या अखेरच्या दिवसांत अमिताभ बच्चन दररोज त्यांना संध्याकाळी रुग्णालयात भेटत होते. ‘फॅमिली कट्टा’ अमिताभ यांना दाखवण्याची त्यांची शेवटची इच्छा मात्र अपूर्ण राहिल्याचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family katta the film team introduction
First published on: 02-10-2016 at 02:27 IST