दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते आणि मिमिक्री आर्टिस्ट कलाभवन नवास यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी चोट्टानिक्कारा, कोची येथील एका हॉटेलच्या खोलीत कलाभवन मृतावस्थेत आढळले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ५१ वर्षांचे कलाभवन या हॉटेलमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी थांबले होते. ते शुक्रवारी संध्याकाळी चेक आउट करणार होते, परंतु बराच वेळ झाला तरी ते रिसेप्शनवर आले नाहीत, त्यामुळे हॉटेलमधील कर्मचारी त्यांच्या खोलीत गेले. तिथे ते बेशुद्ध अवस्थेत आढळले.

कलाभवन यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय पोलिसांना आहे. कलाभवन यांच्या निधनाच्या वृत्ताने मल्याळम सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. कलाकार व चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

द हिंदूमधील वृत्तानुसार, कलाभवन यांचे शवविच्छेदन शनिवारी कलामसेरीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात केले जाईल आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे पार्थिव सोपवण्यात येईल. कलाभवन यांचा मृतदेह चोट्टानिक्कारा येथील एसडी टाटा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

मल्याळम चित्रपट ‘प्रकंबनम’ च्या शूटिंगसाठी कलाभवन हॉटेलमध्ये थांबले होते. शुक्रवारी संध्याकाळी ते हॉटेल सोडणार होते, पण ते चेक-आउटसाठी रिसेप्शनवर आलेच नाहीत. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन पाहिलं. तर ते खोलीत बेशुद्धावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खोलीत काहीही संशयास्पद आढळलं नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कलाभवन यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

कलाभवन नवास यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत मिमिक्री कलाकार, गायक आणि अभिनेता म्हणून काम केलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. त्यांनी १९९५ मध्ये ‘चैतन्यम’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाभवन यांनी मिमिक्स ॲक्शन 500, हिटलर ब्रदर्स, ज्युनियर मँड्रेक, मट्टुपेट्टी माचान आणि अम्मा अम्माय्याम्मा, चंदामामा आणि थिल्लाना थिल्लाना यासह अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या.