कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पारंपारिक कोळी गाण्यांचा बादशाह अशी त्यांची खास ओळख होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सुरुवातीला त्यांच्यावर अंधेरी पश्चिम या ठिकाणी असणाऱ्या ब्रह्मकुमारी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. केईएम रुग्णालयात उपचार घेत असताना आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुप्रसिद्ध लोकशाहीर म्हणून काशीराम लक्ष्मण चिंचय यांना ओळखले जाते. कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. डोल डोलतंय वाऱ्यावर माझी, डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, वेसावची पारू, हिच काय गो गोरी गोरी पोरी यासारखी अनेक कोळीगीतांचे ते गीतकार होते. मी हाय कोळी, सन आयलाय गो यासारखी अनेक कोळी गाण्यांचे ते गीतकार होते.
विजय कठीण आणि काशीराम चिंचय हे दोघे सोबत गाणी बनवायचे. त्यांच्या सर्व कॅसेट “वेसावकर आणि मंडळी” या नावाने व्हीनस कंपनीने प्रसिद्ध केल्या होत्या. या वेसावकर मंडळीने मानाची प्लॅटिनम डिस्कही मिळवली होती. फक्त भारतात नव्हे तर कोळी, आगरी पारंपरिक गाण्यांचा ठेका त्यांनी सातासमुद्रापार नेला. जात, धर्म, प्रांत या बाहेर जाऊन त्यांनी निर्माण केलेल्या कोळी संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना नाचायला लावले.
काशीराम चिंचय यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचे फोटो पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचे अनेक चाहते, तसेच आगरी कोळी समाजाकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ‘वेसावची पारू’ पोरकी झाली, अशी भावना अनेकजण व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन विवाहित कन्या असा परिवार आहे. आज दुपारी १ वाजता त्यांच्यावर वेसावे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.