जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. एक अद्भुत विश्व या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळालं होतं. आज तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दूसरा भाग येत आहे तरी प्रेक्षक यासाठी अजूनही प्रचंड उत्सुक आहेत.
गेल्याच महिन्यात २००९ साली आलेला ‘अवतार’ चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित केला होता आणि या चित्रपटाने पुन्हा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. जेव्हा या दुसऱ्या भागाचा पहिला ट्रेलर आला होता तेव्हा तर त्यात एकही संवाद नव्हता तरी तो ट्रेलर प्रेक्षकांना आवडला होता. त्यातले व्हिज्यूअल्स, स्पेशल इफेक्ट हे खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. आता याच दुसऱ्या भागाचा आणखी एक ट्रेलर नुकताचा प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरला पसंती मिळाली आहे, पण या चित्रपटाचे कन्नड भाषिक चाहते चांगलेच नाराज दिसत आहेत.
आणखी वाचा : निळ्या विश्वात हरवून जाण्यासाठी प्रेक्षक सज्ज; ‘अवतार द वे ऑफ वॉटर’चा जबरदस्त दूसरा ट्रेलर प्रदर्शित
‘अवतार २’ चा ट्रेलर हिंदी, तामीळ, तेलुगू, मल्याळम भाषेत प्रदर्शित केला गेला आहे, पण कन्नडमध्ये नाही शिवाय चित्रपटाच्या पोस्टरवरही कन्नड भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार असंदेखील म्हंटलेलं नाही. त्यामुळे या चित्रपटाचे कन्नड भाषिक चाहते नाराज आहेत आणि त्यांनी त्यांची नाराजी सोशल मीडियावर व्यक्तदेखील केली आहे. इतकंच नाही तर कन्नड भाषेतील टीझर ५ महिन्यांपूर्वी प्रदर्शित केला होता तो डिलिट केला असल्याचंही चाहत्यांचं म्हणणं आहे. कन्नड भाषेत चित्रपटाची कमाई उत्तम होते याचे दाखलेसुद्धा कित्येक चाहत्यांनी दिले आहेत.
कित्येकांनी चित्रपटाचे स्टुडिओ आणि दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांना टॅग करत याबद्दल खंत व्यक्त केली आहे. अजूनतरी या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबद्दल अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. पण यामुळे कन्नड भाषिक चाहते नक्कीच दुखावले गेल्याचं सोशल मिडियावर स्पष्ट होत आहे इतकंच नाही तर #AvatarInKannada हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. अवतारचा हा दूसरा भाग २० डिसेंबर २०२२ या दिवशी चित्रपटगृहात झळकणार आहे. शिवाय येणाऱ्या काही वर्षात या चित्रपटाचे आणखी ३ भाग बघायला मिळणार आहेत.