आमिर खान, कमल हसन, सुबोध भावे, नाना पाटेकर असे काही कलाकार भारतीय सिनेसृष्टीतील अत्यंत प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखले जातात. पडद्यावर जी व्यक्तिरेखा साकारायची आहे, त्या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत शिरण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या मंडळींची असते. अनेकदा त्यांचे हे प्रयोग त्यांच्या जीवावर देखील बेततात. परंतु ही मंडळी आपले प्रयोग काही थांबवत नाहीत. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा देखील सध्या या प्रयोगशील कलाकारांच्या यादीत नाव प्रस्थापीत करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता फरहान ‘तुफान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये फरहान एका बॉक्सरच्या अवतारात दिसत असुन त्यासाठी त्याने केलेली जबरदस्त मेहनत त्याच्या शरीरयष्टीवरुन दिसत आहे. ओम प्रकाश मेहरा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. येत्या २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल.

याआधी फरहान ‘भाग मिल्खा भाग’ या स्पोर्ट ड्रामा चित्रपटामध्ये झळकला होता. हा चित्रपट भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित होता. त्यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी फरहान जवपास तीन वर्ष तयारी करत होता. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या मिल्खा सिंग यांची भूमिका वठवणे अत्यंत कठीण बाब होती असे फरहानने त्यावेळी झालेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्यासारखी शरीरयष्टी तसेच त्यांची धावण्याची व बोलण्याची शैली हुबेहुब वठवण्यासाठी फरहने तासनतास सराव केला होता. सततच्या या सरावाचा त्याच्या शरीरावरही परिणाम झाला. त्याला पाठीच्या कण्याचा त्रास जाणवू लागला. परंतु त्यानंतर त्याने चित्रपटात केलेला अभिनय पाहून त्याने सर्वांचीच मने जिंकली होती.