‘र्फजद’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत बऱ्याच दिवसांनी ऐतिहासिक आणि युद्धपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सरदार कोंडाजी र्फजद आणि पन्हाळा किल्ला काबीज करण्यासाठी मूठभर मावळ्यांच्या मदतीने दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे, तर नवोदित अभिनेता अंकित मोहन याने कोंडाजी र्फजदची भूमिका साकारली आहे. ‘र्फजद’च्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि कलाकार चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, प्रसाद ओक यांच्याशी साधलेला संवाद..

साहसी दृश्य हाताळण्यात यश

शिवाजी महाराजाच्या कोंडाजी र्फजद या सरदाराच्या पराक्रमावर आधारित हा चित्रपट आहे. अवघ्या साठ मावळ्यांनी अडीच हजार मुघल सैनिकांचा पराभव केला आणि पन्हाळगडाची मोहीम साडेतीन तासांत फत्ते केली. कमी मनुष्यबळ आणि युद्धसामग्रीच्या बळावर शत्रूवर विजय मिळवून युद्ध जिंकल्याची ही एकमेव ऐतिहासिक घटना मानली जाते. चित्रपटामध्ये साठ ते सत्तर टक्के साहसी दृश्ये आहेत. शिवाजी महाराज यांची रणनीती, त्यांचा गनिमी कावा त्याचबरोबर मराठय़ांची शस्त्रे, युद्ध करण्याचे प्रकार याचेही दर्शन चित्रपटातून घडणार आहे. मराठी चित्रपटांना साहसी दृश्ये हाताळता येत नाही हे चित्र या चित्रपटामुळे नक्कीच पुसले जाईल. चित्रपटात दाखविण्यात आलेली सर्व साहस दृश्ये कलाकारांनी तालीम करून स्वत: केली आहेत. त्यासाठी डमी (दुसऱ्या) कलाकाराची मदत घेण्यात आलेली नाही. सर्व कलाकारांचे  सहकार्य आणि पूर्वनियोजन यामुळे चित्रपट सशक्त झाला आहे.

– दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक

 

समृद्ध करणारी भूमिका

दिग्दर्शकासोबत झालेल्या चित्रपट वाचनाच्या वेळी शिवाजी महाराजांची भूमिका मी करणार असल्याचे ठरविले गेले नव्हते. मात्र हीच भूमिका करायला मिळावी असे वाटत होते आणि पुढे ती कलाकार म्हणून समृद्ध करणारी भूमिका मला करायला मिळाली. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकार करण्याचे एक दडपण मनावर होते. मात्र शिवाजी महाराज यांची वेशभूषा केल्यानंतर आपण सामान्य नाही याची जाणीव झाली. मित्र, मुलगा, राजा अशा स्तरांवर शिवाजी महाराज यांचे विविध पैलू साकारण्यास मिळाले. तलवारबाजीचे प्रशिक्षण माझ्यासाठी महत्त्वाचे होते. कारण महाराज दोन्ही हातांनी तलवारबाजी करत असल्याचे दृश्य चित्रपटात आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले. ‘तू माझा सांगाती’सारखी मालिका गेली चार वर्षे करत असल्याने त्या काळातील भाषा आणि संस्कृतीची जाणीव होती. त्यामुळे संहिता सादरीकरणाच्या अनुषंगाने फार मेहनत करावी लागली नाही. युद्धाच्या चित्रीकरणाच्या वेळी विशेष मेहनत घ्यावी लागली. पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे चित्रपटातील शेवटच्या युद्धाचे दृश्य एका प्रसंगातच (वन शॉट) चित्रित करण्यात आले.

– चिन्मय मांडलेकर, अभिनेता

 

सहा वेगवेगळ्या भूमिका

‘र्फजद’मध्ये मी ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका केली असून बहिर्जी यांनी गुप्तहेर म्हणून साकारलेल्या सहा वेगवेगळ्या भूमिका या चित्रपटात मला करायला मिळाल्या. एका भूमिकेच्या वेशांतरासाठी सुमारे दीड तास लागत होता. बऱ्याच वेळा पावसामुळे चित्रीकरणाचा खोळंबा होत असल्याने पाऊस गेल्यानंतर चित्रीकरणाला ताबडतोब सुरुवात व्हायची. अशा वेळी दिग्दर्शक या नात्याने दिग्पाल यांनी कधीही वेशभूषेसाठी लागणाऱ्या वेळेबाबत तक्रार केली नाही. प्रत्येकच कलाकाराला आपण कोणत्या चित्रपटात काम करत आहोत, याची जाणीव असल्याने सर्व जण गांभीर्याने काम करत होते.

प्रसाद ओक, अभिनेता

चित्रपटात गणेश यादव, अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, प्रवीण तरडे, आस्ताद काळे, हरीश दुधाडे, नेहा जोशी, राहुल मेहेंदळे, निखिल राऊत, राजन भिसे, अंशुमन विचारे, रोहन मंकणी, सचिन देश्पांडे, समीर धर्माधिकारी, प्रद्युम्न सिंग आदी इतर कलाकार आहेत.

आयुष्याला कलाटणी देणारा चित्रपट

‘र्फजद’ चित्रपटाचा एक भाग होणे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मी मूळचा दिल्लीचा असल्याने मुंबईत कामानिमित्त आल्यानंतरही मराठी भाषेची ओळख झाली नव्हती. त्यामुळे ‘र्फजद’सारख्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली आणि ती स्वीकारली. आयुष्यामध्ये चांगले काही घडण्यासाठी कलाटणी देणाऱ्या एखाद्या घटनेची किंवा संधीची आवश्यकता असते. ही कलाटणी देणारा क्षण ‘र्फजद’च्या निमित्ताने माझ्या आयुष्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीविषयी फारशी माहिती नसल्याने चित्रपटात आपण कोणाबरोबर काम करणार आहोत याची जाणीव नव्हती. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतर आपण अनुभवसंपन्न कलाकारांसोबत काम करत असल्याचे जाणवले. माझ्या भूमिकेसाठी खूप मेहनत घ्यावी लागली. भाषा, संस्कृती नवीन असल्याने ती आत्मसात करण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले. संहितेमधील संवाद समजण्याकरिता हिंदीत भाषांतरित केलेले संवाद मला देण्यात आले होते. त्याचा खूप उपयोग झाला. शिवाजी महाराज यांच्या काही गडांवर जाऊन ऐतिहासिक पाश्र्वभूमीही समजून घेतली.

– अंकित मोहन, अभिनेते

(संकलन – अक्षय मांडवकर)