रवींद्र पाथरे

चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांनी एकेकाळी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमे गाजवले. पण त्यांना आपल्या आयुष्याचे गणित मात्र कधीच नीट सोडवता आले नाही. त्यांनी आपल्या परीने ते सोडवायचा वेळोवेळी प्रयत्न केलाही, परंतु त्यात त्यांना नेहमीच अपयश आलं. शिक्षणाचा अभाव आणि परिस्थितीची निकड यांना सामोरे जात त्यांनी आपली चित्रपट कारकीर्द आणि आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केला. या प्रवासात शोषण, अपमान, दारुण निराशा यांनी त्यांचा सतत पाठलाग केला. त्यातून पलायनाचा मार्ग म्हणून मग त्या व्यसनाकडेही वळल्या. अनेकांकडून त्यांनी भक्कम साथीची अपेक्षा केली. पण त्यात त्या यशस्वी झाल्या नाहीत. मात्र त्यातूनही त्यांच्यात कधी कटुता आली नाही. अखेरच्या काळात त्यांनी ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मकथन लिहिलं. ते खूप गाजलं. वादग्रस्त ठरलं. अरुण साधू यांनी ‘माणूस’मध्ये ते क्रमश: शब्दबद्ध केलं. नंतर ते पुस्तकरूपानेही प्रसिद्ध झालं. खरं तर त्यांचं कथन शब्दश: प्रसिद्ध झालं असतं तर खूप वादळी ठरलं असतं असं म्हणतात. त्यावर श्याम बेनेगल यांनी ‘भूमिका’ हा चित्रपट निर्माण केला. ज्यात स्मिता पाटील यांनी हंसा वाडकरांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांच्या आत्मकथनाचं पुढे इंग्रजीत जसबीर जैन आणि शोभा शिंदे यांनी ‘यू आस्क, आय टेल’ या शीर्षकानं रूपांतरही केलं. अलीकडेच ‘आविष्कार’ निर्मित, विश्वास सोहोनी रूपांतरित-दिग्दर्शित ‘सांगत्ये ऐका’ हे मानसी कुलकर्णी अभिनित एकपात्री नाटक रंगमंचावर आलं आहे.

Kiran mane on shahu maharaj kolhapur
“कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना…,” किरण मानेंचा संताप; म्हणाले, “…तर मी उदयनराजेंना मत देणार नाही”
vidya balan on nepotism
“इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही”, नेपोटिझमवर विद्या बालनचं स्पष्ट विधान; म्हणाली, “सर्व स्टार किड्स…”
Nita Ambani Dance on Zingaat in ajay-atul live concert in nmacc
Video: अजय-अतुलच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये थिरकल्या नीता अंबानी, ‘झिंगाट’वर केला डान्स, पाहा व्हिडीओ
Marathi singer juilee joglekar answer to trollers whos call old lady and talk about her teeth
म्हातारी म्हणणाऱ्यांना अन् दातावरून हिणवणाऱ्यांना जुईली जोगळेकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “स्वतःची अक्कल…”

हेही वाचा >>>ओटीटीवर वर्ष सिक्वेलचे!

भारतात सिनेमायुग सुरू झालं तेव्हा त्यात काम करण्यासाठी शिकलेल्या, सुसंस्कृत कुटुंबांतील मुली मिळत नसत. मग कलावंतीण, देवदासी, वेश्या, मुजरा करणाऱ्या कोठेवाली युवती अशा व्यवसायांतील स्त्रिया चित्रपटांतून आल्या. स्वाभाविकपणेच या स्त्रियांची आर्थिक तंगी, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांचे शोषणही मोठ्या प्रमाणावर होत असे. त्यातूनही अनेक चांगल्या कलाकार घडल्या. कालांतरानं सिनेमायुग पुढे गेलं. विकसित झालं. नंतर सुशिक्षित, वरच्या आर्थिक स्तरांतील मुलीही सिनेमात येत गेल्या आणि ही परिस्थिती बदलली. पण सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटात आलेल्यांपैकी हंसा वाडकर या एक. आई-वडील आत्यंतिक गरीब, व्यसनी. त्यामुळे वयाच्या १३ व्या वर्षीच हंसाबाईंना चित्रपटात काम करावं लागलं. ज्यांच्याशी अल्पवयात लगभन झालं ते जगन्नाथ बंदरकर यांच्याशी. हंसा वाडकरांना सुखाचा संसार करायचा होता. परंतु त्यांचं ते स्वप्न काही पुरं होऊ शकलं नाही. बंदरकर यांनीही आपल्या आर्थिक दुरवस्थेत हंसाबाईंना सिनेमात काम करण्यास भाग पाडलं. पण सतत संशयानं बंदरकरांनी हंसाबाईंचं सांसारिक जिणं हैराण केलं. असं असलं तरीही त्या सिनेमांतून काम करतच राहिल्या. मुलांना जन्म देत राहिल्या. पैकी त्यांची एकच मुलगी जगली. वाचली. मात्र, बंदरकरांच्या जीवघेण्या जाचामुळे त्या दारूच्या व्यसनाकडे वळल्या. अनेक पुरुषांच्या जाळ्यात ओढल्या गेल्या. त्यांनीही त्यांचा वापर करून त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. पुढे नाटकातील एक कलाकार राजन जावळे यांच्या संपर्कात त्या आल्या. तेव्हाच थोडंफार स्थिर आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं. पण त्यांचं सुखी संसाराचं स्वप्न मात्र कधीच पूर्ण होऊ शकलं नाही.

हेही वाचा >>>‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..

आपल्या आयुष्यातील या सगळ्या उलथापालथींचा, स्थित्यंतरांचा ऊहापोह हंसाबाईंनी आपल्या ‘सांगत्ये ऐका’ या आत्मकथनात केला आहे. त्यात आपली झालेली ही फरपट मांडताना त्यांनी कुठंही आकांडतांडव केलेलं नाही. जे जसं अनुभवलं, भोगलं, ते तसंच त्यांनी त्यात मांडलं आहे. त्यात कोणतीही पोझ नाही की अरण्यरुदनही नाही. इतक्या तटस्थपणे कसलेला लेखकही आपल्या आयुष्याकडे बघू शकला असता की नाही याबद्दल शंकाच आहे.

रूपांतरकार आणि दिग्दर्शक विश्वास सोहोनी यांनी हंसाबाईंच्या आत्मकथनातील मोजकेच प्रसंग कोरून त्यांची नाट्यमय गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडली आहे. आणि त्याचं शीर्षकही ‘सांगत्ये ऐका’च ठेवलं आहे. हंसाबाईंची जडणघडण, सिनेमातलं पदार्पण, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील ठेचा, खाचखळगे, व्यथावेदना, त्यांचं अध:पतन, मधेच स्वत:ला सावरणं, सिनेमातील कारकीर्द असा सगळा प्रवास त्यांनी या नाटकात मांडला आहे. एक व्यक्ती म्हणून हंसाबाईंची झालेली पिळवणूक, शोषण, त्यातून मार्ग काढण्याचे त्यांचे असफल प्रयत्न, त्यातून मग व्यसनाकडे वळणं, पुरुषांचे आलेले कडवट अनुभव, संसारसुखाची त्यांची आस, जगण्याने त्यांना दिलेले कटु अनुभव यांचा एक कोलाज यात आपल्याला पाहायला मिळतो. हंसाबाईंचं सबंध जगणंच त्यातून साकारतं. एक माणूस आणि एक अभिनेत्री म्हणून त्यांच्या वाट्याला आलेले खाचखळगे, यशापयश, या सगळ्याशी झगडताना त्यांना आलेले अनुभव, त्यातून त्यांचं घडत-बिघडत जाणं, त्यांनी वास्तवाचा केलेला स्वीकार याचं सम्यक चित्र सोहोनी यांनी नाटकात उभं केलं आहे. व्यक्तीच्या आयुष्यातील नियतीशरणता आणि तिचं भागधेय हे आकळून घेण्याचा हा प्रयत्न आहे. एकपात्री प्रयोग असल्याने एकातून एक प्रसंगांची सलग मालिका गुंफण्याचं कौशल्य दिग्दर्शकाला दाखवावं लागलं आहे.

मानसी कुलकर्णी या सशक्त अभिनेत्रीने हे आव्हान तितक्याच ताकदीनं आणि जबाबदारीनं पेललं आहे. हंसाबाईंचं निखळ निर्झरासारखं जगण्याचं स्वप्न आणि त्यात येत गेलेल्या बाधा, टक्केटोणपे, त्यांचे रागलोभ, हर्ष-खेद, त्यांचं अध:पतन, तरीही विजिगीषु वृत्तीनं त्यांनी समोर ठाकलेल्या संकटांशी दिलेला लढा, अखेरच्या काळात त्यांनी आयुष्याचा जसा आहे तसा केलेला स्वीकार… या सगळ्या भावनिक, मानसिक आंदोळांचा एक उत्तम, चित्ताकर्षक आलेख मानसी कुलकर्णी यांनी लयबद्धतेनं रेखाटला आहे. मुद्राभिनय आणि देहबोली यांचा सुयोग्य वापर करत हंसाबाईंचं अवघं चरित्र आणि चारित्र्य त्यांनी उभं केलं आहे.

नेपथ्यकार एकनाथ कदम यांनी फ्लडलाइट्स, मोठा आरसा, ऑर्गन, चित्रपट दिग्दर्शकाची खुर्ची, कॉस्च्युम्सचा पेटारा, फिल्मची रिळं आदींतून आवश्यक ती वातावरणनिर्मिती केली आहे. हृषिकेश आमरे यांनी प्रकाशयोजनेतून यातले प्रसंग नाट्यपूर्ण केले आहेत. सुहिता थत्ते यांची वेशभूषा आणि शरद विचारे यांची रंगभूषा नाटकाला आवश्यक ते दर्शनी रूप बहाल करते.