दाक्षिणात्य चित्रपटांचे समीक्षण करणारे प्रसिद्ध समीक्षक कौशिक एलएम यांचे निधन झाले आहे. सोमवारी (१५ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे तामिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत पोस्ट शेअर केल्या आहेत.

कौशिक एलएम यांना मनोरंजन क्षेत्राची सखोल माहिती आणि अभ्यास असणारे म्हणून ओळखले जायचे. त्यासोबच ते इन्फ्लुएंसर, यूट्यूब व्हिडिओ जॉकी आणि चित्रपट समीक्षणही करायचे. त्यांनी अनेक तामिळ, तेलुगू या भाषेतील चित्रपटांचे समीक्षण केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे प्रसिद्ध समीक्षक असे त्यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांसह इतर कलाकारांना धक्का बसला आहे.

अभिनेता धनुष यानेही त्यांच्या निधनानंतर ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. हे फार हृदयद्रावक आहे !! कौशिक एलएम भाऊ, तुम्ही फार लवकर निघून गेलात. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती माझ्या मनापासून संवेदना, असे ट्वीट करत धनुषने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेशने ट्विटरवर कौशिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ती म्हणाली, ही बातमी ऐकल्यानंतर त्यावर व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. हे अविश्वसनीय आहे! मी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती संवेदना व्यक्त करते. कौशिक आता आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही! तर अभिनेता विजय देवरकोंडा यानेही कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तुझा विचार करुन मी प्रार्थना करतोय. तुझी खूपच आठवण येईल, असे ट्विट विजय देवरकोंडाने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी अत्यंत जड अंत:करणाने हे लिहित आहे. मी कौशिक एलएम यांना अनेकवेळा मुलाखतीसाठी भेटले. त्यावेळी ते नेहमीच खूप छान आणि व्यवस्थित बोलायचे. मी अगदी नवीन असतानाही त्यांनी माझे स्वागत केले. त्यांचे जाणे हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे, असे अभिनेत्री रितिका सिंगने म्हटले आहे.