गायक-संगीतकार राहुल जैनविरोधात एका ३० वर्षीय कॉस्च्युम डिझायनरने तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील अंधेरीमधील त्याच्या घरी राहुलने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या स्टायलिस्टने केला आहे. ही संपूर्ण घटना ११ ऑगस्ट रोजी घडली असल्याचा दावा त्या कॉस्च्युम डिझायनरने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुलविराधात एफआयआर दाखल केली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ओशिवरा पोलीस ठाण्यात संबंधित महिलेने जबाब नोंदवला आहे. यात ती म्हणाली, “राहुलने माझ्याशी इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधला. त्याने माझ्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर त्याने आपली पर्सनल स्टायलिस्ट म्हणून नेमणूक करण्यासाठी मला आश्वासन दिलं. यासाठी त्याने मला त्याच्या अंधेरीतील फ्लॅटमध्ये बोलवलं होतं.”
जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, २१५ कोटींच्या वसुलीप्रकरणी ईडी दाखल करणार आरोपपत्र

“यासाठी त्याने त्याच्या अंधेरीतल्या फ्लॅटमध्ये तिला बोलावलं. ती घरी असता राहुल जैन हा तिला बेडरुममध्ये काम दाखवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि त्यानंतर त्याने बलात्कार केला. यावेळी मी प्रतिकार केला असता त्याने माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला”, असा आरोप संबंधित स्टायलिस्टने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३९६ (बलात्कार), ३२३ (दुखापत) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

या सर्व आरोपांचे राहुलने खंडन केले आहे. तो म्हणाला, “मी या महिलेला ओळखत नाही. तिने केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. यापूर्वीही एका महिलेने माझ्यावर असेच आरोप केले होते, पण मला न्याय मिळाला. ही महिला त्या महिलेची सहकारी असू शकते.” राहुलवर याआधी असे आरोप काही महिलांनी केले आहे. राहुल आणि त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांवर बलात्कार, बळजबरीने गर्भपात, मूल सोडून दिल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप होता.

राहुलने २०१४ मध्ये MTV शो एमटीव्ही अलॉफ्ट स्टारमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर त्याच्या करिअरची सुरुवात झाली. त्याने स्पॉटलाइट या वेब सीरिजमधील तेरी याद, १९२१ मधील आने वाले कल, घर से निकला, ना तुम रहे तुम आणि चल दिया तुमसे दूर यांसारखी गाणी गायली आहेत. त्याने ‘कागज’ आणि ‘झूठा कहीं का’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तसंच काही वेब सीरिजमध्येही संगीतकार म्हणून काम केलं आहे.