छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका दिवसेंदिवस रोमांचक वळणावर जात असून प्रेक्षकांमध्ये तिची लोकप्रियता वाढत आहे. सध्या घराघरात पोहोचलेल्या या मालिकेमुळे अंबरनाथमध्ये चक्क अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली असून यात एक कर्मचारी जखमी झाल्याचं समोर आलं आहे.

अंबरनाथ अग्निशमन दलाचे जवान प्रकाश कराड हे बुधवारी सायंकाळी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका पाहत होते. यावेळी त्यांचा सहकारी किशोर भोर याला भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट सामना पाहायचा होता. त्यामुळे किशोरने टीव्हीचे चॅनल बदलून तो क्रिकेट सामना पाहत बसला. यातून किशोर आणि प्रकाश यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाले आणि या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं.

दरम्यान, रागाच्या भरात किशोरने लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे प्रकाश जखमी झाला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात किशोरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.