उद्यापासून टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा अकरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक भाग घेणार आहेत, याची उत्सुकता असतानाच ‘कलर्स’ वाहिनीचे सीईओ राज नायक यांनी बिग बॉसच्या घराचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे.
‘बिग बॉस’च्या घराचं प्रवेशद्वार आणि त्यासमोरील उद्यानाचा भाग या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. शोच्या प्रीमिअरची सर्व तयारी झाली असून घरसुद्धा आकर्षक दिव्यांनी सजवण्यात आले आहे. या सिझनचे सूत्रसंचालन सलमान खान करणार असून यंदा ‘शेजारी’ (पडोसी) ही नवीन थीम पाहायला मिळणार आहे.
#BREAKING !!!!
First look #BiggBoss11 pic.twitter.com/jZabENMANY— Raj Nayak (@rajcheerfull) September 29, 2017
शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांची यादी सोशल मीडियावर काही दिवसांपासून फिरत आहे. यामध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेची हिना खान, वेब सीरीज निर्माता विकास गुप्ता, ‘स्प्लिट्सविला’ फेम प्रियांका शर्मा, हितेन तेजवानी, शिल्पा शिंदे, ढिंच्याक पूजा यांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. शोच्या प्रीमिअरला सर्व स्पर्धकांची ओळख प्रेक्षकांना करण्यात येईल.
#PinkyPadosan will give you interesting tidbits and gossip that you really don’t want to miss. #BB11 pic.twitter.com/gtIDkZXKxf
— Bigg Boss (@BiggBoss) September 30, 2017
मागील सिझनप्रमाणेच यावेळीसुद्धा सेलिब्रिटींशिवाय सामान्यांमधूनही काही स्पर्धक शोमध्ये भाग घेणार आहेत. याशिवाय, धार्मिक गुरू शिवानी दुर्गा, पाटणा येथे राहणारी ज्योती कुमारी, आयटम डान्सर सपना चौधरी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा जावई जुबेर खान हेदेखील शोमध्ये सहभागी होणार आहेत.