dilip thakurललिता पवर म्हणताक्षणीच त्यांचे व्यक्तिमत्व पटकन आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. १८ एप्रिल रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यांची मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील तब्बल सत्तर वर्षाची अभिनय वाटचाल आहे. काही गुजराती आणि भोजपुरी चित्रपटातूनही त्यानी भूमिका साकारल्या. त्यांचा अभिनयाचा प्रवास मूकपटापासूनचा ‘आर्यन फिल्म कंपनी’च्या नानासाहेब सरपोतदार यांच्या ‘पतितोद्वार’ या मूकपटापासून त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. १९२८ सालचा हा चित्रपट. अंबीका लक्ष्मण सगुण हे त्यांचे नाव ‘मिस अंजू’ नावाने त्यांनी चित्रपटात भूमिका साकारणे सुरू केले. १९३८ साली जी. जी. पवार यांच्याशी विवाह होताच त्या ‘ललिता पवार’ झाल्या. मा. भगवान त्यांच्या थोबाडीत मारतात अशा स्टंटपटातील एका दृश्याच्या वेळी दादांचा हात त्यांना असा बसला की डोळ्याला कायमची इजा झाली. पण हताश न होता, त्याही रुपात त्यांनी खूप मोठी वाटचाल केली. त्याचा त्यानी अभिनयात वापर केला. फारसे शिक्षण नसूनही त्यानी हिंमत मेहनत आणि निरीक्षण शक्ती या गुणांवर झेप घेतली. पौराणिक, ऐतिहासिक अशा चित्रपटातून सामाजिक-कौटुंबिक चित्रपटात आल्या. दागमध्ये दारुचे व्यसन असणाऱ्या शंकरची (दिलीपकुमार) व्यथित आई त्यानी अशी साकारली की प्रेक्षकाना रडू यावे. ‘अनाडी’तील ‘मिस डीसा’ यापेक्षा वेगळी. ‘श्री ४२०’, ‘सुजाता’, ‘ससुराल’, ‘आनंद’… अशा हिंदी चित्रपटांप्रमाणेच ‘मानाचं पान’, ‘अमर भूपाळी’, ‘सतीचं वाण’, ‘चोरीचा मामला’ इत्यादी मराठी चित्रपटांमधून त्यानी भूमिका साकारल्या. ‘सासूरवाशीण’मधील त्यांनी साकारलेली खमकी सासू अशी काही होती की, ‘सौं दिन सास कें’ या हिंदी रिमेक चित्रपटातही त्यांनाच संधी मिळाली. प्रत्यक्षात ललिता पवार अत्यंत निगर्वी आणि आपुलकीने वागणाऱ्या. आयुष्याच्या अखेरीला त्या मुंबईसोडून पुण्याला राहायला गेल्या. पण त्यांचा शेवट धक्कादायक ठरला. फेब्रुवारी ९८ मध्ये त्यांच्या मृत्यूसमयी त्यांच्याजवळ कोणीही नव्हते. एक दोन दिवस बंद असणारा त्यांचा दरवाजा फोडला तेव्हा समजले की… ललिता पवार यांचा शेवट असा व्हायला नको होता.