हे मजकूरासोबतचे छायाचित्र नेमके कोणत्या चित्रपटातील आहे हे कदाचित ‘श्वास’पासूनची (म्हणजेच २००३ पासूनची) मराठी चित्रपटाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे अनुभवत असलेल्या प्रेक्षकांच्या लक्षात येणार नाही, पण रसिकांच्या दोन पिढ्यांनी मात्र एव्हाना हे ‘माफीचा साक्षीदार’ या चित्रपटाचे छायाचित्र आहे ओळखले असेलच व त्याबरोबरच ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीलाच पुणे शहरात घडलेल्या जोशी अभ्यंकर कुटुंबातील अनेकांची दुर्देवी हत्या करण्यात आली त्यावर आधारित हा चित्रपट होता हेदेखील एव्हाना लक्षात आले असेल. अशा थरारक वास्तव घटनेवर चित्रपट निर्माण करायचा तर अनेक प्रकारची आव्हाने असतात. सत्य घटनेचे नेमके कोणते तपशील चित्रपटात घ्यावे? ते मनोरंजनाच्या चौकटीत व्यवस्थित बसतील काय, ते करतानाच मूळ घटनेचे गांभीर्य तर कमी होणार नाही ना, संबंधित कुटुंबियांच्या इतर नातेवाईक व मित्र परिवाराला हे सगळेच मान्य होईल ना, या प्रकरणाने हादरून गेलेले पुणेकर या चित्रपटाचे कसे स्वागत करतील, सेन्सॉर बोर्ड काही आक्षेप तर घेणार नाही ना आणि काही आक्षेप घेतलाच तर….. असे अनेक प्रश्न व अनपेक्षित आव्हाने स्वीकारून निर्माते हिरालाल शहा व दिग्दर्शक राजदत्त यानी या चित्रपटावर काम सुरु केले. मधुसूदन कालेलकर यानी हे भयाण वास्तव विचारात घेऊन पटकथा व संवाद लिहिले. पटकथेत ते अत्यंत अनुभवी असल्याने या चित्रपटाबाबत विश्वास वाटला. मुळ घटनेतील जक्कल, सुतार इतरांच्या व्यक्तिरेखेनुसार युवा कलाकारांची निवडही झाली. नाना पाटेकर, किशोर जाधव, प्रदीप पवार, बिपीन वर्टी, जयवंत मालवणकर व मोहन गोखले यांची त्या मास्टर मांईड युवकांच्या भूमिकेसाठी निवड झाली. इतर भूमिकांत अविनाश खर्शिकर, उषा नाईक, आशालता, रवि पटवर्धन इत्यादींची निवड झाल्यावर चित्रीकरण सुरु झाले. चित्रपटातील नृत्यांसाठी कामिनी भाटिया, पद्मा खन्ना व बिंदूची निवड झाली. याचा अर्थ चित्रपट व्यवस्थित पूर्ण झाला असे नव्हे. एक तर मूळ घटनेतील काही धक्कादायक तपशीलानुसार पटकथेत काही फेरफार करावे लागले, त्यातच राजदत्त यानी काही कारणास्तव नम्रतेने दिग्दर्शन सोडले. त्यामुळे व्ही. रविंद्र यांजकडे दिग्दर्शन आले. काही भागांचे पुन्हा चित्रीकरण करायचे ठरताच हा चित्रपट मराठीसह हिंदीतही “फांसी का फंदा ” नावाने डब करायचे ठरले. सेन्सॉर बोर्डाने मात्र काही दृश्यांवर आक्षेप घेताच रिवायझिंग समितीकडे म्हणजेच दिल्लीत जायचे ठरले. निर्मात्यांनी प्रत्येक पायरीवर संघर्ष केला. यात वेळ , पैसा व शक्ती खूपच खर्च झाली. समाजाला हादरवून टाकणाऱ्या घटनेवर आधारित चित्रपट निर्माण करण्याचा प्रवास असा खूपच आव्हाने व अडथळे यांचा ठरला. अखेर १९८६ साली ‘माफीचा साक्षीदार’ प्रदर्शित झाला. पण चित्रपट निर्मितीवस्थेत असताना प्रसार माध्यमातून चर्चा होताना समाजातील विविध घटक या चित्रपटाकडे लक्ष देत होते ते वातावरण सेन्सॉर बोर्डाने तब्बल दोन वर्षे हा चित्रपट अडकवून ठेवल्याने बरेचसे निवळले होते…
– दिलीप ठाकूर