बाहुबलीला कटप्पाने का मारले? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना मिळाल्यानंतर आता बाहुबलीला टक्कर देऊ शकेल, असा बॉलिवूडमध्ये कोणता चित्रपट आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. पण या प्रश्नाचं उत्तर घेऊनच सलमानचा ‘ट्युबलाइट’चा टिझर आला. ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या बॉलिवूडच्या भाईजानच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या टिझरला प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनापूर्वीच ‘ट्युबलाइट’ने एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. यात चक्क बाहुबलीही मागे पडला. काही दिवसांपूर्वी सलमानचा बहुचर्चित ‘ट्युबलाइट’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला. ४८ तासांत १ कोटींहून अधिक लोकांनी हा टिझर पाहिला. आतापर्यंत हा टिझर पाहणाऱ्यांची संख्या १ कोटी ४० लाखांहून अधिक झाली आहे. कमी वेळात मोठ्या प्रमाणात पाहिला गेलेला टिझर म्हणून ‘ट्युबलाइट’च्या नावे हा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. ‘बाहुबली’ला जे जमले नाही ते आपल्या ‘सुलतान’ने शेवटी करून दाखवले, असेच म्हणावे लागेल.

प्रभास आणि राणा डग्गुबतीच्या अभिनयाने साकार झालेला ‘बाहुबली २’ या चित्रपटाने १००० कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित करत भारतीय चित्रपटसृष्टीत एक वेगळी छाप पाडली. त्यामुळे बॉलिवूडमधील खान मंडळींसाठी या चित्रपटाने एक नवे आव्हान निर्माण केले. कटप्पाने बाहुबलीला का मारले? याचे उत्तर मिळविण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासून ‘बाहुबली २ ‘ला जोरदार प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद अद्यापही कमी झालेला नाही. मराठी चित्रपटसृष्टीत गतवर्षी नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाने जी जादू दाखवली होती. तशीच काहीशी जादू यावर्षी ‘बाहुबली २’ हा चित्रपट दाखविताना दिसतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी तेलगू चित्रपटाने बॉलिवूडसाठी मोठं आव्हान निर्माण केलंय असंच म्हणावं लागेल. या चित्रपटाला सलमानचा आगामी चित्रपट टक्कर देणार का? अशी चर्चा रंगत आहे. या चर्चेला ‘ट्युबलाइट’च्या टिझरला मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळताना दिसते.