अवघ्या काही दिवसांतच या वर्षाची सांगता होणार आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे वर्ष कसं काय सरसर निघून गेलं हाच प्रश्न अनेकांच्या मनात सध्या घर करु लागला आहे. त्यातही अनेकांच्या मनात रुखरुख आहे ती म्हणजे यंदाच्या वर्षी फसलेल्या संकल्पांची. नवीन वर्ष आणि हटके संकल्प हा जरी आता एक ट्रेंड बनला असला तरीही खूप कमी जणांचे संकल्प पूर्णत्वास जातात हेच खरे. काही कारणास्तव धकाधकीच्या आयुष्यात, रोजच्या धावपळीत सर्व काही निभावून नेताना कळत-नकळत या संकल्पांकडे दुर्लक्ष होतं. पण, तरीही सध्याच्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षासाठी कोणता संकल्प करायचा हा प्रश्न अनेकांच्याच मनात आल्यावाचून राहात नाही. आपल्या कॉलेजच्या दिवसांना उजाळा देणाऱ्या फ्रेशर्स या मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका पाहताना प्रत्येक पात्र हे आपल्यातलंच एक आहे असं वाटल्याशिवाय राहत नाही. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या फ्रेशर्सचे नवीन वर्षाचे संकल्प काय आहेत हे जाणून घेऊया.
मिताली मयेकर – मला नुकत्याच आलेल्या काही अनुभवांवरून मी असं ठरवलंय की मी या पुढे कुठल्याही व्यक्तीला पटकन जज नाही करणार. त्या व्यक्तीबद्दल मला काही वैयक्तिक अनुभव आल्यावरच मी त्यांच्या बद्दल माझं मत बनवेन.
शुभंकर तावडे – आपण सहसा सण आणि त्यांचं सेलिब्रेशन लाऊड म्युजिक सोबत करतो आणि त्या सेलिब्रेशनचा मनमुराद आनंद घेतो. पण आपल्या या अशा सेलिब्रेशनचा जे लोक भाग नसतात त्यांना मात्र त्याचा खूप त्रास होतो. म्हणूनच वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासोबतच मी ठरवलं आहे की मी येत्या नवीन वर्षात ध्वनी प्रदूषण थांबवण्याचा आणि निरोगी वातावरण ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. ‘पर्यावरणवादी होणे’ हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे.
अमृता देशमुख – येणाऱ्या नवीन वर्षात मी खूप पुस्तकं वाचण्याचा संकल्प केला आहे. शूटिंग आणि बिझी शेड्युलमुळे मला वाचनाला वेळ देता येत नाही आहे. म्हणून मी २०१७ मध्ये माझ्या वाचनाला देखील वेळ देण्याचं ठरवलं आहे.
रश्मी अनपट – आजकाल आपल्या फास्ट पेस लाइफस्टाईलमुळे आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणून माझा नवीन वर्षाचा संकल्प असा आहे की मी ताजे आणि पौष्टिक पदार्थच खाणार. तसंच व्यायाम आणि मेडिटेशन नियमितपणे करणार. मुळात या बिझी शेड्युलमधून जो वेळ स्वतःसाठी देणं जमत नव्हतं तर तो वेळ मी स्वतःला येत्या नवीन वर्षात देण्याचं ठरवलंय.
ओंकार राऊत – २०१७ या नव्या वर्षासाठी माझे २ महत्वाचे संकल्प असे आहेत की मी नखं खाण्याची सवय सोडणार. तसेच सर्व ठिकाणी वेळेत पोहोचणार. कारण वक्तशीरपणा हा खूप महत्वाचा आहे. त्याचसोबत या नव्या वर्षी मी खूप लिहिण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येक महिन्यात किंवा २ महिन्यातून एक झाड लावण्याचं मी ठरवलंय.
रसिका वेंगुर्लेकर – २०१७ मध्ये या बिझी शेड्युलमधून मी माझ्या आवडत्या गोष्टी जस की पुस्तकं वाचणे, लिखाण करणे यासाठी वेळ काढण्याचं ठरवलं आहे. तसंच मला माझं भरतनाट्यम अरंगेत्रम पूर्ण करायचं आहे. त्याचसोबत मला २०१७ मध्ये उर्दू भाषा शिकायची आहे.
सिद्धार्थ खिरीड – आजकालच्या हेक्टिक आणि बिझी शेड्युलमुळे तसंच स्ट्रेसमुळे आपण रोजच्या छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना आपण मुकतो. त्यामुळे मला २०१७ हे नवीन वर्ष माझ्यासाठी अजून जास्त युथफूल, अॅक्टिव्ह बनवायचं आहे आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाचे क्षण अनुभवायचे आहेत.