‘मैत्री’ हा शब्द दिसायला कितीही लहान असला तरी त्याची व्याप्ती आणि खोली खूप आहे. आयुष्याच्या वाटेव आपल्याला अनेक नवनवीन मित्रमैत्रिणी भेटतात. यात काही जण आपल्यासाठी खास होतात तर काही जण आजन्म आपल्यासोबतची मैत्री टिकवून ठेवतात. त्यामुळेच अशा मित्रांसाठी आणि मैत्रिणींसाठी खास फ्रेंडशीप डे साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे याच मैत्रीवर आधारित बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील काही चित्रपट पुढील प्रमाणे –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. नमकहराम
आनंद चित्रपटानंतर नमकहराम या चित्रपटात राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. फॅक्टरीत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अमिताभ आपल्या खास मित्राला म्हणजेच राजेश खन्नाला युनियनमध्ये पाठवतो. युनियनचा सूड घ्यायचा असाच अमिताभचा उद्देश असतो. मात्र राजेश खन्ना कामगारांमध्ये राहून त्यांच्या बाजूने होतो अशी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ‘दिये जलतें है फुल खिलते है. बडी मुश्कीलसे मगर दुनियामें दोस्त मिलते है’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

२. दोस्ती
६० च्या दशकात प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला होता. एक आंधळा माणूस आणि एक लंगडा माणूस या दोघांमधल्या मैत्रीचे अनोखे बंध या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात सुशील कुमार, सुधीर कुमार आणि संजय खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘राही मनवा दुख की चिंता क्यूँ सताती है’, ‘मेरी दोस्ती मेरा प्यार’, ‘जानेवालो जरा मुडके देखो मुझे..’ ही आणि एकापेक्षा एक अजरामर गाणी या चित्रपटाने दिली. सिनेमाचा मूळ धागा होता तो एका आंधळ्या आणि लंगड्या माणसामधली मैत्री आणि त्यांच्यात निर्माण झालेले भाव बंधन. हा चित्रपट पाहताना आजही डोळ्यात पाणी येते. याचे यश यातच आहे असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही

३. जंजीर
अमिताभला अँग्री यंग मॅनची इमेज मिळवून देणारा चित्रपट म्हणजे जंजीर. या चित्रपटात अमिताभने साकारलेला इन्सपेक्टर विजय आणि त्यातला शेर खान अर्थात प्राण या दोघांची मैत्रीही तितकीच अजरामर ठरली आहे. ‘यारी हैं इमान मेरा यार मेरी जिंदगी’, हे गाणं आजही प्रेक्षकांना मध्ये लोकप्रिय आहे.

४. आनंद
७० च्या दशकात आलेला सुपरहिट चित्रपट म्हणजे आनंद. सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ या दोघांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. कॅन्सर झालेला आनंद (राजेश खन्ना) आणि त्याचा आजार माहित असलेला डॉक्टर भास्कर (अमिताभ बच्चन) या दोघांमध्ये झालेली सहा महिन्यातली मैत्री ह्यात दाखविण्यात आली आहे. ‘जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं’, ‘आनंद मरा नहीं’, ‘आनंद मरते नहीं’, हे संवाद प्रचंड गाजले.

५. शोले
शोले हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ठरला. शोले ही सूडकथा होती. मात्र चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचं मन जिंकलं. या चित्रपटाच दिग्दर्शन जी. पी. सिप्पी यांनी केलं असून कथा सलीम जावेद यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील दोन चोरांची म्हणजेच जय आणि विरूची जोडी आजही तितकीच अजरामर आणि स्मरणात राहिलेली आहे. विरू (धर्मेंद्र) पाण्याच्या टाकीवर चढतो तो प्रसंग असेल,किंवा जय आणि विरू रामगढला पहिल्यांदा येतात, एकमेकांमध्ये टॉस करून प्रत्येक गोष्ट ठरवत असतात हा प्रसंग असेल असे अनेक प्रसंग या दोघांनी जिवंत केले आहेत. या दोघांची खास दोस्ती आणि त्यांचे ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं अजरामर झालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship day 2020 top 5 bollywood movies about friendship you must watch ssj
First published on: 02-08-2020 at 08:34 IST