सातत्याने दहा वर्षे ‘दिवाळी पहाट’निमित्त ‘गगन सदन तेजोमय’ हा कार्यक्रम सादर होतोय. यंदा २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ६.४५ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर येथे हा विनामूल्य कार्यक्रम होणार असून याची संकल्पना विनोद पवार यांची आहे.
गरजू लोकांचे तेजोमय करणाऱ्या निरलस व्यक्तींचा सत्कार केला जातोय. सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तींना ध्यास पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा धुळे जिल्ह्य़ातील बारीपाडा गावात वनसंवर्धन, शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या चैत्राम पवार यांचा सत्कार केला जाणार आहे. औरंगाबादचे डॉ. अनंत पांढरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानची स्थापना करून अत्यंत वाजवी दरात रुग्णांची शुश्रूषा करण्याचे कार्य केले. तसेच डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे समर्थपणे संचानल करून संस्थाबांधणीमध्ये स्वत:ला झोकून दिले. त्यांचाही सन्मान यंदा केला जाणार आहे. तर पेणजवळच्या आदिवासींसाठी विशेषत: स्त्री सबलीकरणाचे काम करणाऱ्या अहिल्या या संस्थेलाही ध्यास पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
या ध्यास पुरस्कार सोहळ्याबरोबरच दिवाळीची पहाट संगीतमय करण्यासाठी संगीताचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन विश्वास सोहनी यांनी केले असून लता बाकाळकर यांचे नृत्यदिग्दर्शन, तर संगीत संयोजन कमलेश भडकमकर करतील. अंबरीश मिश्र यांच्या संहितेने सजलेल्या या कार्यक्रमात अजित परब, जयदीप बगवाडकर, अनन्या भौमिक, शैलजा सुब्रमण्यम तसेच १२ नामवंत वादक हिंदी गाण्यांचा सुश्राव्य नजराणा सादर करतील. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या तीन दिवस आधी रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये उपलब्ध होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gagan sadan tejomay on diwali dawn
First published on: 19-10-2014 at 12:59 IST