‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या सिनेमाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमातल्या एका प्रसंगाने माझं आयुष्य बदलून गेलं असं म्हणत अभिनेत्री हुमा कुरेशीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तो आहे ज्या फोटोत मोहसीना हमीद (हुमा कुरेशी) आणि फैझल खान (नवाजुद्दीन सिद्दीकी) बसले आहेत. मी जेव्हा जेव्हा हा प्रसंग आठवते तेव्हा मला हसू येतं. माझ्या आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा क्षण होता असंही हुमाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

फैजल आणि मोहसीना तलावाच्या काठावर बसलेले असतात. अचानक फैजल मोहसीनाचा हात धरतो. ती हात झटकते आणि त्याला रागवते.. लटकेपणाने म्हणते याला काय अर्थ आहे? तुला वाटलं म्हणून तू हात पकडणार का? तो गोंधळून कावराबावरा होतो.. तेव्हा मोहसिना म्हणते पहले परमिशन लेना चाहिये ना.. परमिशन लेके रखिये हात.. कोई मना थोडे ही है.. तिचा हा डायलॉग ऐकताच एकच हशा पिकतो. गँग्ज ऑफ वासेपूर सिनेमातला हा प्रसंग खरोखरच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आयुष्यात घडला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने अनेक मुलाखतींमध्ये या प्रसंगाचा उल्लेखही केला आहे. परमिशन सीन म्हणून हा व्हिडीओ यू ट्युबवरही फेमस आहे. याच सीनचा फोटो पोस्ट करत हुमा कुरेशीने गँग्स ऑफ वासेपूरला आठ वर्षे झाल्याची आठवण करुन दिली आहे. तसंच या प्रसंगाने माझं आयुष्य बदलून गेल्याचंही म्हटलं आहे.