बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकतंच संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कामाठीपुरामध्ये काम करणाऱ्या महिलांबद्दल भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी चित्रपटांमध्ये वेश्या, वेश्या व्यवसाय आणि रेड लाईट परिसरातील दृश्य दाखवले आहे.

नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत संजय लीला भन्साळी म्हणाले, “मी मुंबईच्या रेड लाईट परिसरातील कामाठीपुराजवळील चाळीत लहानाचा मोठा झालो आहे. ज्याठिकाणी ‘गंगूबाई काठियावाडी’ सेट आहे. त्याच ठिकाणी मी राहायचो. त्यावेळी मी अनेक वेश्या व्यवसाय करणाऱ्या अनेक महिलांना पाहिले आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातही वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेची कथा सांगितली आहे. ज्या महिलेने वेश्या व्यवसाय करणाऱ्या जीवन सुधारण्याचे काम केले आहे.”

“तुम्ही लहानपणी जे पाहता त्याबद्दल तुम्ही फार संवेदनशील होता. एखाद्या व्यक्तीची किंमत २० रुपये कशी काय असू शकते? माझ्या मनात ही गोष्ट अनेक वर्ष होती. पण मला काहीही समजत नव्हते. माणूस हा अमूल्य असतो. त्यामुळे त्याला कोणतीही किंमत लावली जाऊ शकत नाही. त्याला ५ रुपये, २० रुपये किंवा ५० रुपयांना विकता येत नाही. ते अमानवीय आहे”, असेही संजय लीला भन्साळी म्हणाले.

यापुढे ते म्हणाले, “मी दररोज शाळेत जाताना हे सर्व बघायचो. त्यामुळे मी याबाबत फार संवेदनशील होतो. वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या मागे एक वेगळी कथा दडलेली असते. पण त्या स्वत: ज्याप्रकारे रंगरंगोटी करतात की त्यामुळे त्यांचे दु:ख दिसत नाही. हे आपल्यापैकी कोणीही करु शकत नाही. एखादा सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टही हा मेकअप करु शकत नाही. त्यावेळी एखादा चित्रपट निर्माता म्हणून माझ्यासाठी ते क्षण खूप महत्त्वाचे आहेत.”

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटापूर्वी संजय लीला भन्साळी यांनी ‘देवदास’ चित्रपटातही एका वेश्येच्या आयुष्याबद्दल दाखवले आहे. तसेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘हिरामंडी’ चित्रपटाची कथाही वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर आधारित आहे.