चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी लाखो तरुण जीवाची त्रेधा करत असतात. अनेक जण तर मुंबईत कोणताही ठावठिकाणा नसताना केवळ जिद्द आणि कला सिद्ध करण्यासाठी इथे येतात. त्यापैकी प्रत्येकाला संधी मिळतेच असं नाही, पण अनेकदा अंगी कसब असूनही वशिलेबाजीमुळे ही संधी दुरावली जाते. कधी घराणेशाहीमुळे तर कधी कंपूशाहीमुळे. ही परिस्थिती हिंदीतच आहे असे नाही. हा प्रकार मराठीतही सर्रास सुरू असल्याचे कलाकार सांगतात. फक्त अभिनेता सुशांतसिंहच्या निधनाने हिंदीतील प्रकार उघडकीस आला इतकेच. त्यानंतर माध्यमांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर टीकेची झोड उठवली. काहींनी तिथल्या वातावरणाची सत्यासत्यता पडताळली तर काहींनी आणखी काही निष्कर्ष काढले. याच हिंदी चित्रपटसृष्टीत सुरुवातीपासूनच मराठी कलाकारांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि आजही ते कार्य अविरत सुरू आहे. अशाच काही मराठी कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांचा हा धांडोळा.
मराठीनेच उपेक्षा केली
हिंदीवर ताशेरे ओढताना मराठीत सगळं गोड-गोड सुरू आहे असे नाही. तिथे घडलेल्या घटनेमुळे हा प्रकार समोर आला इतकंच. मराठी चित्रपटसृष्टी छोटी असली तरी इथेही तशी माणसं आहेतच. फक्त ज्याचा त्याचा अनुभव वेगळा. आलेल्या अनुभवातून तरून जायला हवं, कारण इथे कुणी कुणाला घडवत नाही किंवा संपवत नाही. तुमचा तुमच्या कामावर असलेल्या विश्वासावर ते निर्भर आहे. ज्या मोजक्या माणसांकडून असे प्रकार होतात त्यांच्यावर अडून राहण्याचं काही कारण नाही. मी हिंदीमध्ये ज्या ज्या कलाकारांसोबत काम केलं त्यांच्यासोबत वावरताना मला कधीही दडपण आलं नाही. उलट पाठिंबा मिळत गेला. श्याम बेनेगल, रोहित शेट्टी, फराह खान या माणसांनी मला घडवलं, तर सुभाष घईंमुळे मी निर्माता होऊ शकलो. इथे असलेल्या चांगल्या माणसांच्या पाठिंब्यामुळेच मी १६ वर्ष हिंदीत टिकून आहे. याउलट मराठीत काम करताना मला जाणीवपूर्वक दूर केलं गेलं. त्यामुळे सगळीकडे वातावरण तेच आहे. एखाद्या मोठय़ा कलाकाराच्या मुलांसाठी अनेक चित्रपट तयार केले जातात, पण नवोदित मुलाला मात्र एक चित्रपट मिळविण्यासाठी अनेक वर्षे झगडावे लागते. शिवाय प्रत्येक वेळी स्वत:ला सिद्ध करावे लागते. त्यामुळे घराणेशाहीचा त्रास आहे, पण म्हणून कोणावर अन्याय होतो असे म्हणता येणार नाही. कारण प्रेक्षक सुजाण आहे. याच चित्रपटक्षेत्रात अनेक बाहेरून आलेली मुलं आज ‘स्टार’ झालेली आहेत, तर अनेक बडय़ा कलाकोरांच्या मुलांना नाकारलंदेखील गेलं आहे.
– श्रेयस तळपदे</strong>
प्रेक्षक काम पाहतात, तामझाम नाही.
स्पर्धेचा विचार मी कधीच करत नाही, कारण त्यात वेळ गेला तर काम कधी करणार? अभिनय करताना एका कलाकाराने दुसऱ्याशी स्वत:ची तुलना करू नये. कारण प्रत्येकाला मिळालेलं काम वेगळं, परिस्थिती वेगळी. त्याने हेअर स्टायलिस्ट ठेवला म्हणून मला दु:ख का वाटावं? त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं दडपण न घेता माणसाने काम करत राहावं. माझ्या पहिल्या ‘वेबसीरीज’च्या वेळी मला सर्वासाठी तयार केलेलंच जेवण देण्यात आलं. दुसऱ्या वेळी ‘सर तुमच्यासाठी बाहेरून काही मागवायचं का’ अशी विचारणा झाली. पण ती माझी गरज नसल्याने मी आहे तेच जेवलो. मुळात अशा गोष्टींना महत्त्व द्यावं का याचा विचार व्हायला हवा. क्रिकेटर व्हायला ओळख लागते असं म्हणतात. पण मैदानात उतरल्यावर ओळख कामाला येते की कसब. तेच सूत्र इथेही आहे. मातब्बरांच्या मुलांना कदाचित संधी चटकन मिळत असेल पण, टिकून राहण्यासाठी कसब आणि दर्जा लागतो. अक्षय कुमार, शाहरुख खान, राधिका आपटे, अनुराग कश्यप यांच्या पाठीशी कुणाचाही हात नसतानाही ते ‘स्टार’ झाले. त्यामुळे फक्त काम करत राहा. कपूर घराणे याचे उत्तम उदाहरण आहे. राज कपूर, शम्मी कपूर, ऋषी कपूर यांच्याकडे ओळखही होती आणि कसबही. राज कपूर उत्तम दिग्दर्शक झाले, तर शम्मी आणि शशी कपूर अभिनेते झाले. त्यांच्या पुढच्या पिढीत रणधीर आणि ऋषी कपूर अभिनेते झाले, संजना कपूर यांनी पृथ्वी थिएटरची जबाबदारी सांभाळली, पण राजीव, कुणाल आणि करण कपूर यांना प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही. त्यांच्या पुढे करिश्मा आणि करिना आल्या आणि आता रणबीर आहे. त्यामुळे या एका कुटुंबाचा अभ्यास केला तरी घराणेशाही आणि त्याला मिळणारा प्रेक्षकांचा कौल याचा अंदाज येतो.
– जितेंद्र जोशी
कलाकारांना समान व्यासपीठ मिळणे आवश्यक
जेव्हा एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री हिंदीत पदार्पण करते तेव्हा त्याची दखल घेतली जाते. हीच गोष्ट मराठीमधून आलेल्या कलाकारांबद्दल होत नाही. दोन्हीही प्रादेशिकच भाषा आहेत. सर्वानीच या प्रश्नाचा खोलवर जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. कलाकार हिंदीत काम करताना त्याला पुरेसे वातावरण मिळणे आवश्यक आहे. हे वातावरण निर्माण करण्यात दिग्दर्शक आणि स्वत: कलाकार या दोन्हीचेही सहकार्य आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करताना मी स्वत: कामाचा दर्जा ठरवून घेते. भूमिका स्वीकारण्याआधी निर्मात्याला काही गोष्टी स्पष्ट करते. हिंदीतील घराणे आणि कंपूशाहीबद्दल सहकलाकाराकडून ऐकले आहे, मात्र सुदैवाने माझ्या वाटय़ाला असा अनुभव कधीच आला नाही. स्पर्धा ही सर्वच क्षेत्रांत पाहण्यास मिळते. या स्पर्धेत टिकून राहायचे असल्यास एवढे दर्जेदार काम करा की, दिग्दर्शकाला तुमच्या कामाची गरज निर्माण झाली पाहिजे. कला, अभिनय यांसारख्या कलेच्या क्षेत्रात कलाकाराला त्याचे काम सादर करण्यास योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. परदेशात कलाकारांच्या हक्कांसाठी तेथील संस्थाही तेवढय़ाच सक्रिय आहेत. मनोरंजन विश्वात कलाकार, तंत्रज्ञांना किमान वेतन, विमा संरक्षण हे मूलभूत हक्क मिळायला हवेत. टाळेबंदीत या विषयांविषयी आवाज उठवल्यावर आता कुठे त्याची अंमलबजावणी केली जात आहे. माझ्यासाठी भाषा नाही तर काम महत्त्वाचे आहे.
– स्मिता तांबे
राष्ट्रीय पुरस्काराने नजरा बदलल्या
घराणेशाहीवरून केवळ सिनेमाक्षेत्राला बोल लावणं चुकीचं आहे, कारण ती प्रत्येक क्षेत्रात आहे. संघर्षांचं म्हणाल तर मराठी किंवा हिंदी कुठेही जा, कलाकाराला तो करावाच लागणार आहे. देशभरातील लोक या क्षेत्रात पाय रोवू पाहतात अशा वेळी स्पर्धा वाढते आणि परिणामी संघर्ष निर्माण होतो. सुरुवातीच्या काळात मी भरपूर ऑडिशन दिल्या, त्यातून काही छोटय़ा-मोठय़ा भूमिका हाताशी आल्या. मागेपुढे कुणी नाही म्हणून मला ‘ऑफर’ येण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करावं लागलं. ‘धग’ या चित्रपटासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा मात्र माझ्याकडे पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला. मग वेगवेगळ्या भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली. डावलले जाण्याचे प्रकार हिंदी-मराठी दोन्हीकडे होतात, पण या संघर्षांत कायम स्वत:वर काम करत राहायचं. कंपूशाहीमुळे, आवडीच्या लोकांना जवळ करण्याच्या सवयीमुळे अनेकांना कसब नसताना कामं मिळत जातात, पण त्याचा विचार करायचा नाही. इथे अनेक चांगली माणसंही आहेत जी कलाकार घडविण्यासाठी मदत करतात.
– उषा जाधव
प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही
मुळात चित्रपटसृष्टीची हिंदी, मराठी आणि इंग्लिश भाषेत विभागणी करतो ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. काम हे काम असते, मग ते कोणत्याही भाषेतील असू दे. हिंदी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटामधून मी अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. चित्रपटसृष्टीची मराठी आणि हिंदी विभागणी वर्षांनुवर्षे केली जात आहे. आणि ही विभागणी करण्यास प्रेक्षक, कलाकार, निर्माते दिग्दर्शकच जबाबदार आहेत. घराणे आणि कंपूशाही ही प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात आहे. चित्रपटसृष्टीत फक्त घराणेशाही नसून ती संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा सर्व क्षेत्रांत दिसून येते. राज्यात जातीयवादावर आधारित घराणी आणि कंपू आहेत. त्यामुळे त्याला घाबरून कितीही लोकांनी घराणेशाहीचे अस्तित्व नाकारले तरीही वास्तव बदलत नाही. भारतात प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही, रंग, वर्ण- लिंग- भेद अस्तित्वात आहे. पूर्वी या गोष्टीबद्दल फारसे बोलले जात नव्हते. आता एकदम या विषयाला महत्त्व प्राप्त झाले असल्याने सगळेच याबाबतीत बोलू लागले आहेत. मला हिंदी आणि मराठीत काहीच फरक वाटत नाही. या क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक माणसाला कलेच्या माध्यमातून व्यक्त व्हायचे असल्याने तो पडद्यावर व्यक्त होतो. स्पर्धा ही लादली गेली आहे. अर्थात, माझी स्पर्धा ही स्वत:शीच आहे.
– अंजली पाटील
अभिनय हे मेहनतीचे क्षेत्र
प्रेक्षकांना घराणेशाही या शब्दाचा व्यवस्थित अर्थ समजला नाही. घराणेशाही वा कंपूशाहीबद्दल ज्या मोठय़ा कलाकारांचे नाव घेण्यात येते त्या मातब्बरांनाही त्या उंचीवर पोहोचण्यास अमाप कष्ट घ्यावे लागले आहेत. एका रात्रीत कलाकाराला मिळालेल्या यशाची सर्व लोक दखल घेतात. मात्र, त्या पातळीवर पोचण्यासाठी केलेले कष्ट कोणी पाहात नाही. या क्षेत्रात मेहनतीला पर्याय नाही. प्रेक्षकांनी कलाकाराचे काम स्वीकारल्यास त्यांना कोणी अडवू शकत नाही. हिंदीत मराठी कलाकारांविषयी प्रचंड आदर दिसून येतो. मराठी कलाकारांचा अभिनयाचा प्राथमिक अभ्यास पक्का असल्याने ते कोणतीही भूमिका पडद्यावर जिवंत करतात. मी आतापर्यंत ज्या दिग्दर्शकासोबत काम केले तेथे मला उत्तम वागणूक मिळाली. मी आता ‘ब्रेथ’च्या दुसऱ्या भागात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केलेली आहे. पहिल्या भागात माझे काम प्रेक्षक आणि निर्मात्यांना आवडल्याने त्यांनी दुसऱ्या भागात भूमिकेची लांबी वाढवली. या क्षेत्रात चांगले काम करत राहिल्यास त्याची दखल निश्चित घेतली जाते. कामाच्या दर्जानुसार कलाकारांची ओळख ठरते. मला आतापर्यंत तरी हिंदी आणि मराठीत काम करताना आजच्या शब्दात घराणेशाही अनुभवायला मिळालेली नाही.
– हृषीकेश जोशी
तुमची काम हीच ओळख
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत मला फारसा फरक आढळून आला नाही. हिंदीत मला खूपच चांगली वागणूक मिळाली. सगळे सहकलाकार चांगले असून काही अडल्यास मदत करतात. मराठीपेक्षा हिंदीत तुलनेने तुमचे काम जगभरात पोहोचते. या क्षेत्रात तुमचे काम सर्व काही सांगून जाते. त्यामुळे कलाकाराने स्वत:च्या वाटय़ाला आलेले प्रत्येक काम मनापासून केले पाहिजे, कारण या कामावरच त्यांना पुढील संधी मिळतात.
– निखिल रत्नपारखी
शब्दांकन- मानसी जोशी, नीलेश अडसूळ