बिग बी अमिताभ बच्चन यांचा ‘केबीसी’ अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी सुरू झाला होता. दरम्यानच्या काळात त्यांना करोनाची लागण झाली. करोनामुळे कार्यक्रमाचे चित्रीकरण काही दिवसांसाठी थांबले. त्यांच्यामुळे इतर कोणाला करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना विलगीकरणात राहावे लागले. ते या वयातही नव्या गोष्टी शिकत असतात. विलगीकरणात राहत असताना अमिताभ सोशल मीडियाद्वारे त्यांची खुशाली चाहत्यांपर्यंत कळवत होते. ते सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. अमिताभ यांनी नुकताच त्यांच्या ‘गुडबाय’ आगामी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमिताभ यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह नीना गुप्ता, रश्मिका मंदाना आणि पावैल गुलाटी असे कलाकार दिसणार आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये सुनील ग्रोव्हर, एली अवराम, साहिल मेहता, अभिषेक खान यांनी सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. विकास बहल यांनी गुडबाय चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर्स सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते.
आणखी वाचा- ‘लायगर’मुळे विजय देवरकोंडाला मोठा फटका, ‘या’ चित्रपटाचं शूटिंग झालं कायमस्वरूपी बंद

आज ‘गुडबाय’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरवरुन हा चित्रपट एका कुटुंबावर आधारलेला असल्याचे लक्षात येतं. नातेसंबंधाच्या गुंत्यात अडकलेल्या या कुटुंबातील एका व्यक्तीचे निधन होते. निधनामुळे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र येते. फॅमिली ड्रामा असलेला हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२२ मधला अमिताभ बच्चन यांचा हा चौथा चित्रपट आहे. याआधी त्यांचे ‘झुंड’, ‘रनवे ३४’ असे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. गुडबायनंतर ते ‘उंचाईयाँ’ चित्रपटात झळकणार आहेत.

आणखी वाचा- आलिया- रणबीरच्या चाहत्यांसाठी खुशखबर! ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमची मोठी घोषणा

अमिताभ बच्चन यांचे एका वर्षात पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या विषयी बोलताना ते म्हणाले, ”हे माझेसाठी नवीन नाहीये. आधी एका महिन्यात अनेक चित्रपट प्रदर्शित व्हायचे. बरेचदा एका वर्षात माझे ७-८ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. करोनामुळे अनेक चित्रपट अडून राहिले होते. त्यामुळे सलग चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मी आशा करतो की, लोकांना आमचा गुडबाय चित्रपट आवडावा.” करोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनी ‘मी सध्या करोनाला गुडबाय म्हणतो आहे’ असे म्हणत आनंद व्यक्त केला.