अभिनय, नृत्य आणि विनोदाचा उत्तम टायमिंग यामुळे एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. ८० – ९०च्या दशकात गोविंदाचे अनेक चित्रपट हिट ठरले होते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये गोविंदा चित्रपटसृष्टीपासून दूरच होता. मात्र, आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचा हा ‘राजबाबू’ लवकरच रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

वाचा : .. म्हणून ‘सैराट’ फेम नागराज मंजुळेने ‘द सायलेंस’ चित्रपटात केले काम

काही महिन्यांपूर्वी गोविंदाने ‘आ गया हिरो’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एण्ट्री केली होती. पण, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला होता. त्यानंतर आता तो पुन्हा एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. ‘फ्राय-डे’ या चित्रपटात चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहता येईल. चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ‘डॉली की डोली’ फेम दिग्दर्शक अभिषेक डोगरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून साजिद कुरेशीने चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

वाचा : सायना आणि ‘या’ खेळाडूत झालेल्या वादावरील पडदा श्रद्धा उठवणार?

चित्रपटात गोविंदासोबत वरुण शर्माही असणार आहे. वरुण ‘फुकरे’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला होता. या चित्रपटाविषयी गोविंदा म्हणाला की, एक धमाकेदार कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, यामुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होईल. दरम्यान, या चित्रपटात गोविंदाची हिरोइन कोण असणार, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.