अभिनेता अजय देवगण आगामी ‘बादशाहो’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये तब्बल दोन दशके अधिराज्य गाजविणारा अजय आज वयाच्या ४८ व्या वर्षात पदार्पण करतोय. नव्वदच्या दशकात सुरुवातीला अजय देवगणने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या पहिल्या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्याला पदार्पणातील सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अर्थात अजयने या पदार्पणाच्या चित्रपटातून बॉलिवू़डमधील ‘लंबी रेस का घोडा..’ असल्याचे संकेतच त्याने दिले. ‘प्रेमी, आशिक, आवारा….’ या गाण्यावेळी त्याने केलेल्या बाइकवरील स्टंटची चांगलीच चर्चा रंगली. ‘स्वत:ला प्रेमी, आशिक, आवारा..’ असे सांगणाऱ्या अजयच्या अंगी अॅक्शन हिरोचे दिसलेले ते गुणच होते. त्यानंतर ‘जिगर’ चित्रपटात त्याची अफलातून अॅक्शन पाहायला मिळाली. करिश्मा कपूरसोबतच्या अजयचा ही चित्रपटही चांगलाच गाजला. त्यानंतर त्याचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच गेला. अजयचे वडील वीरु देवगण खुद्द चित्रपटातील स्टंट दृश्यांचे मार्गदर्शक असल्यामुळे अजयची चित्रपटात निर्माण झालेली अॅक्शन हिरोची झलक त्याला उपजत मिळाली हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मात्र, अजय फक्त या एकाच चाकोरीत अडकून राहिला नाही. १९९४ मध्ये रविना टंडन सोबतच्या ‘दिलवाले’ चित्रपटातील भूमिकेने त्याने चाहत्यांना हेलावून सोडले. तर महेश भट्ट यांची कलाकृती असलेल्या ‘जख्म’ चित्रपटातील भूमिकेबद्दल राष्ट्रीय पुरस्कार पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अजयचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार होता. १९९९ नंतर अॅक्शन हिरोच्या चित्रपटामध्ये प्रेमाचे रंग दिसू लागले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’. सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटात अजयचा एक वेगळा रंग पाहायला मिळाला. याशिवाय ‘गंगाजल’, ‘सिंघम’ या चित्रपटातून बेधडक अधिकारी साकारत त्याने तरुणाईच्या मनात एक वेगळी छाप सोडली.
‘इश्क’ चित्रपटातून आमिरसोबत विनोदी ढंग सादर करणाऱ्या अजयने रोहित शेट्टीसोबत ‘गोलमाल’ चित्रपटाच्या मालिकेत कमाल धम्माल केल्याचे पाहायला मिळाले. ‘बोलबच्चन’ या चित्रपटातूनही तो विनोदी अंगाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. अर्थातच बर्थडे बॉय अजय देवगणने त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये प्रत्येक भूमिका साकारत हरहुन्नरी अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे. बॉलिवू़डमध्ये तब्बल दोन दशके अधिराज्य गाजविणाऱ्या प्रेमी, आशिक, आवारा…. अजयला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!