झी स्टुडिओजच्या हर हर महादेव या भव्य दिव्य चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटात कोणकोणते कलाकार असतील आणि मुख्य म्हणजे यात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. नुकतंच या चित्रपटाचं डिजीटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. याद्वारे त्याचा उलगडा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील हरहुन्नरी आणि बहुआयामी अभिनेता अशी ओळख असलेला सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची ख्याती आणि कीर्ती ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पसरलेली आहे. देशभरातील लोकांसाठी आजही छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने हा भव्य दिव्य चित्रपट साकारला जात आहे.

आणखी वाचा : समीर चौगुलेला चाहत्याने दिलं अनोखं गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणाले…

मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. विशेष म्हणजे येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे. हर हर महादेव चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यातील एक प्रमुख भूमिकेतील नाव म्हणजे सुबोध भावे असणार आहे. सुनिल फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी केले आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला की, “छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मनात आपसूकच आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण होते. केवळ मराठी माणूसच नव्हे तर इतर भाषिकांसाठीही अखंड प्रेरणेचं उर्जास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे असे मी मानतो. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काही तरी आव्हानत्मक भूमिका करायला मिळाव्यात अशी कायम इच्छा असते.

आणखी वाचा : “ती मूर्ख…” आलियाच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चित्रपटगृहाचा मालक संतापला

माझ्यासाठी ‘ड्रीम रोल’ असलेली ही भूमिका केवळ आव्हानात्मकच नाही तर एक फार मोठी जबाबदारी आहे याची जाणीव मला आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचा मी इमानेइतबारे प्रयत्न केलेला आहे. दिवसाअंती आनंद आणि समाधान देणा-या काही भूमिका असतात. या भूमिकेने मला तो आनंद ते समाधान आणि जगण्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन दिलाय. अभिजित देशपांडेचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, अतिशय बंदिस्त पटकथा आणि झी स्टुडिओजमुळे लाभलेलं दर्जेदार निर्मितीमूल्य यांनी सज्ज झालेला हर हर महादेव हा चित्रपट मराठीसह इतर भाषांमधूनही प्रदर्शित होणार असल्याने आनंद द्विगुणीत झालेला आहे.” असे सुबोध भावे म्हणााला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Har har mahadev marathi movie these famous marathi actor to play chhatrapati shivaji maharaj nrp
First published on: 03-09-2022 at 16:21 IST