लैंगिक शोषण, शरीरविक्री, कास्टिंग काउच हे विषय चंदेरी दुनियेसाठी आता नवीन नसले तरी सध्या अमेरिकन चित्रपट निर्माता हार्वे वेन्स्टिनमुळे हा विषय पुन्हा एकदा जोमाने उसळून बाहेर आला आहे. आतापर्यंत अँजेलिना जोली, एशिया अर्गेटो, ग्वेनेथ पाल्ट्रो, लॉरेन सिवन, एमा वॉटसन यांसारख्या तब्बल ४०पेक्षा जास्त प्रतिष्ठित हॉलीवूड अभिनेत्रींनी हार्वे विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा जगभरातून आवाज उठवला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा थेट परिणाम हार्वेच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही मोठय़ा प्रमाणावर झालेला दिसतो. सर्वात प्रथम त्याच्या घटस्फोटित पत्नीने त्याच्याविरोधात कौटुंबिक छळाचा खटला दाखल केला. पुढे ऑस्कर पुरस्कार वितरित करणाऱ्या अ‍ॅकॅडमीच्या सदस्य पदावरून त्याची हकालपट्टी करण्यात आली. तसेच जोपर्यंत त्याच्यावर असलेल्या गुन्ह्य़ांमधून तो निर्दोष सुटत नाही तोपर्यंत त्याला कंपनीच्या कोणत्याही पदावर घेतले जाणार नाही. शिवाय त्याच्या ‘द वेन्स्टिन’ या कंपनीने निर्मिती केलेल्या कोणत्याही चित्रपटाला पुढील काही काळ ऑस्कर पुरस्कारांसाठी ग्राह्य़ धरले जाणार नाही. या एकामागून एक त्याच्या विरोधात घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे गेल्या काही दिवसांत त्याला काही कोटी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले आहे. परंतु त्याच्या प्रतिक्रियांवरून ही आलेली संकटे त्याला अपेक्षित होतीच असे दिसते. पण ज्या कंपनीच्या जोरावर त्याने प्रतिष्ठा व आपले आर्थिक साम्राज्य उभारले त्याच कंपनीतील इतर सदस्यांनी त्याच्याविरोधात आर्थिक घोटाळ्यांचे आरोप केल्यामुळे हार्वे पूर्णपणे बिथरला आहे. कारण या कंपनीच्या रूपाने त्याचे अस्तित्वच आता पणाला लागल्याचे दिसून येत आहे. संकटे येतात तेव्हा ती चहू बाजूंनी हल्ला करतात. आजवर अनेक नवोदित कलाकारांची कारकीर्द उद्ध्वस्त करणाऱ्या हार्वे वेन्स्टिनला याची प्रचीती सध्या येत आहे.