डोळ्यांमध्ये गडद सुरमा, सुरम्याच्या त्या रंगातूनही समोरच्याला घाबरवणारी भेदक नजर पाहिल्यावर हीच दाऊदची बहिण आहे यावर तुमचाही विश्वास बसेल. हीच आहे ती रुपेरी पडद्यावरची हसीना पारकर. ‘क्वीन ऑफ मुंबई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हसीनाच्या जीवनावरील एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हसीना : क्वीन ऑफ मुंबई’ या चित्रपटातून एका वेगळ्या काळासह अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘हसीना’च्या आपल्या भेटीला येणार आहे. श्रद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटातील तिचा आणखी एक लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

श्रद्धाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा नवा पोस्टर ट्विट करत अनेकांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टरमध्ये तिचा संपूर्ण चेहरा दिसत नसला तरीही डोळ्यांतून व्यक्त होणारे भावच सर्व काही सांगून जात आहेत. त्यासोबतच पोस्टरवर दिसणारी टॅगलाइनसुद्धा अशीच रंजक असून, त्यातून एक कटू सत्य समोर येत आहे. ‘अठ्ठासी केसेस दर्ज, पर कोर्टमे हाजरी सिर्फ एक बार’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर देण्यात आली आहे. त्यामुळे अठ्ठ्याऐंशी खटल्यांपैकी फक्त एकाच खटल्याला कोर्टात हजेरी लावणाऱ्या हसीना पारकरबद्दल जाणून घेण्यासाठी आता प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

वाचा : अज्ञात व्यक्तीने सलमानच्या अपार्टमेण्टमधील टॉयलेटमध्ये केला शिरकाव आणि मग….

श्रद्धाच्या याआधीच्या चित्रपटांपैकी ‘हसीना…’मधील तिचा लूक फार वेगळा असणार आहे. त्यासोबतच या भूमिकेसाठी तिनेही बरीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती नाहिद खान करत आहे. या चित्रपटातून दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत खुद्द श्रद्धाचा भाऊच झळकणार आहे. सिद्धार्थ कपूर आणि श्रद्धा कपूर ही बहिण- भावाची जोडीसुद्धा या चित्रपटातील आकर्षणाचा विषय ठरत आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्व, गँगवॉर आणि एका वेगळ्या मुंबईची झलक पाहायला मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

shraddha1