Hemant Dhome Movie Ticket Price : चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची मजा वेगळीच असते. परंतु, चित्रपटगृहांमधील चित्रपटांचे तिकीट दर पाहून अनेकजण घरी बसून टीव्हीवर, मोबाईलवर चित्रपट पाहणं पसंत करतात. तर अनेकजण क्वचितच चित्रपटगृहांची वाट धरतात. मात्र, कर्नाटक राज्यातील लोक आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी करताना दिसतील. कारण, तिथल्या सरकारने चित्रपटांच्या तिकीटदरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमधील सिंगल स्क्रीन थिएटर असो अथवा मल्टीप्लेक्स तुम्हाला आता चित्रपट फक्त २०० रुपयांमध्ये पाहता येणार आहे. तुम्ही कोणत्याही चित्रपटाचं तिकिट घ्या त्याची किंमत ही फक्त २०० रुपये किंवा त्याहून कमी असणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारनं शुक्रवारी (७ मार्च) चित्रपटप्रेमींसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.

सिद्धरामय्या यांच्या सरकारने सादर केलेल्या १६ व्या अर्थसंकल्पात हा निर्णय जाहीर केला आहे. कर्नाटकमध्ये कन्नड भाषेतील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर कन्नड चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी एक ओटीटी प्लॅटफॉर्म बनवणार असल्याचंही सरकारने जाहीर केलं आहे. दरम्यान, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सरसकट सर्वच कानडी चित्रपट कलाकार, दिग्दर्शक व निर्मात्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसेच वेगवेगळ्या राज्यांमधील त्या-त्या भाषेतील चित्रपटसृष्टीत सक्रीय असणाऱ्या कलाकारांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं असून असाच निर्णय त्यांच्या राज्यांमधील सरकारांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मराठी कलाकार देखील यात मागे नाहीत. अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे याने देखील या निर्णयाचं कौतुक करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारने देखील असा निर्णय घ्यायला हवा.

हेमंत ढोमेची फडणवीस पवारांकडे मोठी मागणी

हेमंत ढोमे याने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे, “कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय! कर्नाटक या आपल्या शेजारच्या राज्याने आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे! सर्वच्या सर्व सिनेमागृहात चित्रपटाच्या तिकिटांची किंमत ही जास्तीत जास्त २०० रुपये इतकी मर्यादित असणार! आपल्या भाषेतला चित्रपट मोठा व्हावा यासाठी उचलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं आणि संपूर्ण देशाला मार्गदर्शक असं पाऊल ठरणार आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या दोघांकडून अशाच निर्णयाची अपेक्षा मी एक प्रेक्षक म्हणून सगळ्यात आधी करतो. त्यानंतर मराठी भाषा आणि आपल्या भाषेतील चित्रपटांच्या भवितव्याकरिता सिनेमागृहांच्या मनमानी कारभाराला आपण आळा घालाल ही इच्छादेखील व्यक्त करतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्रात मराठीलाच प्राघान्य हवं!”

हेमंत ढोमे याने म्हटलं आहे की महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रीन्स उपलब्ध होणं, त्यांना प्राईम टाइम मिळणं यासाठी आता कायदा करण्यात यावा! महाराष्ट्रात मराठीलाच प्राघान्य हवं! शिवाय महाराष्ट्रात सर्व वाहिन्या व ओटीटी प्लॅटफॉर्म्सची कार्यालयं आहेत, तर कर्नाटक सरकारसारखं आपणही त्या सर्वांना मराठीला प्राधान्य देणं अनिवार्य करावं ही विनंती! मला खात्री आहे की आपलं सरकार मराठीसाठी, मराठी चित्रपट व्यवसायासाठी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचलेल!”