कलाविश्वात भारतीय चित्रपटसृष्टीतील कालकारांनीही अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं आहे. ज्यामध्ये प्रत्येक कलाकाराने आपलं वेगळेपण जपत कलेची साधना केली. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे आर.डी. बर्मन.
संगीताला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणाऱ्या आर.डींची आणखी एक ओळख म्हणजे पंचम दा. बरेच निकटवर्तीय त्यांचा उल्लेख पंचम असाच करतात. पण, मुळात त्यांना ही ओळख मिळाली कशी माहितीये? आर.डी. बर्मन यांच्या जयंतीनिमित्त आपण आज या गोष्टीचा उलगडा करणार आहोत. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांना आर.डींनी एकदा पाच सूर ऐकवले होते आणि तेव्हापासूनच ‘पंचम’ ही ओळख त्यांना मिळाली. संगीत क्षेत्रात पंचम दा यांच्या योगदानविषयी काही सांगण्यापेक्षा त्यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली गाणीच सर्वकाही सांगून जातात. पण, तरीही त्यांच्या आयुष्यातील काही असे किस्से आहेत, जे खरंच या कलाकाराला आणखी महान करुन जातात आणि त्यांच्या कलात्मकतेचा आपल्यालाही वारंवार हेवा वाटतो. चला तर मग जाणून घेऊया असेच काही रंजक किस्से…
वाचा : ३०८ मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्तनं वापरली ‘ही’ युक्ती
वयाच्या नवव्या वर्षी पंचम दा यांनी आपलं पहिलं गाणं संगीतबद्ध केलं, ज्याचा वापर १९५६ च्या ‘फंटूश’ चित्रपटात करण्यात आला.
पंचमदांचे वडील एस. डी. बर्मन हे देखील प्रसिद्ध संगीतकार होते. एस. डी. बर्मन यांच्या ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू’ , ‘सिर जो तेरा चकराए’, ‘कोरा कागज था ये मन मेरा’ या गाण्यांमध्ये पंचम दांचादेखील सहभाग होता.
संगीतात नवीन प्रयोग करणे हे त्यांचं कौशल्य होतं. ‘चुरा लिया’ गाण्यासाठी ग्लासवर चमच्याने हळूवार प्रहार करून त्यांनी आवाज ध्वनिमुद्रित केला होता. एकदा पावसाचा आवाज ध्वनिमुद्रित करण्यासाठी त्यांनी अख्खी रात्र पावसात घालवली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीत ब्राझिलचे बोस्सा नोव्हा रिदमचा वापर करणारे बर्मन हे पहिले संगीतकार होते. ‘पती पत्नी’ चित्रपटात आशा भोसले यांनी गायलेल्या ‘मार डालेगा दर्द-ए-दिल’ गाण्यासाठी या रिदमचा वापर करण्यात आला होता.
खूप कमी जणांना माहित असेल की, ‘सोलवा साल’ चित्रपटातील हेमंत कुमार यांनी गायलेल्या ‘है अपना दिल तो आवारा’ या गाण्यातील माउथ ऑरगन हे स्वतः आर.डी.बर्मन यांनी वाजवले होते.
पंचम या नावाव्यतिरिक्त ते तुबलू या नावानेदेखील परिचित होते. त्यांना हे नाव त्यांच्या आजीने दिले होते. पंचम हे नाव त्यांना अशोक कुमार उर्फ दादामुनींकडून मिळाले होते.
‘चुरा लिया’ या गाण्यात बर्मन यांनी ग्लासवर चमचा मारून निर्माण होणा-या ध्वनीचा वापर केला होता. ‘अब्दुल्ला’ गाण्यासाठी बर्मन यांनी बांबूला फुगा बांधून त्यातून निर्माण होणा-या ध्वनीचा संगीतासाठी वापर केला होता.