संत आणि शूरवीरांची भूमी म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जातं. देशाच्या आजवरच्या इतिहासात अनेक वीरांची आणि त्यांच्या शौर्यगाथेची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळेच या वीरांची शौर्यगाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे आज पाहायला गेलं तर कलाविश्वात ऐतिहासिक चित्रपटांची संख्याही बरीच असल्याचं दिसून येतं. यामध्येच आता पुन्हा एका वीराची शौर्यगाथा उलगडण्यात येणार आहे. समुद्रातील गनिमी काव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांचा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भारताचे पहिले नौदल प्रमुख ज्यांचा समुद्रातील शिवाजी म्हणून अखंड मुलखात परिचय होता, ज्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता असे भारताचे पहिले नौदल प्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा लवकरच कान्होजी आंग्रे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

कान्होजी आंग्रे यांची धास्ती संपूर्ण युरोपच्या नौसेनेला होती. विशेष म्हणजे कान्होजी आंग्रे यांचा पराभव करण्यासाठी इंग्रज,डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज हे सगळे एकत्र आले होते. मात्र तरीदेखील ते दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचा पराभव करु शकले नाही. त्यामुळेच त्यांचा इतिहास सर्वसामन्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने कान्होजी आंग्रे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

दरम्यान, डॉ. सुधीर निकम लिखित हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच चित्रपटाची निर्मिती क्रिटीव्ह मदारीस प्रस्तुत राहुल जाधव आणि पर्यवेक्षक निर्माते राहुल भोसले करत आहेत. विशेष म्हणजे कान्होजी आंग्रे सारख्या वीर योद्ध्याचा इतिहास लवकरच उलगडणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. परंतु, अद्याप केवळ चित्रपटाची घोषणा झाली असून यात कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.