|| सुहास जोशी
लोकप्रिय कलाकृतीचा रिमेक करण्याचा मोह अनेकांना हमखास होतोच. पण त्यातून निर्माण होणारा इतर भाषेतला, देशातला अवतार तेवढाच दर्जेदार होईल याची खात्री देता येत नाही. अनेकदा मूळ कथेची पाश्र्वभूमी इतर भाषांमध्ये, देशांमध्ये तेवढीच पर्याप्त नसेल तर मग चांगलाच फियास्को होऊ शकतो. पण योग्य काळजी घेऊन मांडणी केली तर मूळ कथेइतकाच रिमेकदेखील उत्तम ठरू शकतो, याचे उदाहरण म्हणजे ‘हॉट स्टार’वरील ‘होस्टेजेस’ ही वेबसीरिज.
एका कुटुंबातील सर्वानाच ओलीस धरण्याचा हा प्रकार. मात्र यामध्ये त्या बंदीवासातून मुक्ततेसाठी बाहेरून सरकार अथवा अन्य यंत्रणांकडून काही मागणी करण्याऐवजी घरातीलच एका व्यक्तीकडून एका ठरावीक कामगिरीसाठी दबाव आणला जातो, असा हा काहीसा वेगळा प्रकार. डॉ. मीरा आनंद ही एका प्रथितयश रुग्णालयातील शल्यचिकित्सक असते. त्याच रुग्णालयात राज्याच्या मुख्यमंत्र्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली जाणार असते. ज्या दिवशी मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल होतात त्याच रात्री मीरा आनंद यांच्या घरातील सर्वानाच ओलीस धरले जाते. त्यांच्या आयुष्याच्या बदल्यात डॉ. मीरा यांना एकच काम करायचे असते, ते म्हणजे मुख्यमंत्र्यांना शस्त्रक्रियेदरम्यान एक विशिष्ट औषध देऊन त्यांचा जीव घेणे. अर्थातच डॉ. मीरा यांना ते करणे शक्य नसते. पण कुटुंबाच्या आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे त्यांची द्विधावस्था होते. काहीही करून शस्त्रक्रिया पुढे ढकलायचादेखील त्या प्रयत्न करतात. पण त्यांना यश मिळत नाही. दुसरीकडे त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही समस्या असतात. तर त्यांच्या घरात घुसलेल्या लोकांचा प्रमुख हा नुकताच निवृत्त झालेला पोलीस अधीक्षक असतो. त्यामुळे एकूणच साऱ्या घटनाक्रमाला अनेक वळणे मिळत जातात.
ओलीसनाटय़ ही घटना चित्रपटांसाठी अगदी हमखास वापरला जाणारा फॉम्र्यूला आहे. त्यामध्ये ओलिसांना सोडवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यावर सर्वाधिक भर असतो. पण येथे घटना वेगळ्या पद्धतीने मांडल्या आहेत. त्यामुळे कथानकातील नाटय़ टप्प्याटप्याने वाढत जाते. त्यात कधी कधी अतिशोयक्ती होते, पण एकूण घटना रंगवण्यासाठी ते सारे पूरक ठरते. तुलनेने त्यात व्यवहार्यता असेल तर मग ते पाहताना त्रास होत नाही. ‘होस्टेजेस’मध्ये याचे भान बऱ्यापैकी राखले आहे.
‘होस्टेजेस’ ही मूळ इस्रायली वेबसीरिज आहे. त्याचा रिमेक हॉटस्टारने केला आहे. पण हा रिमेक आहे हे जाणवणार नाही याचे भान सीरिजकर्त्यांनी राखले आहे. खरे तर देश बदलल्यानंतर एकूणच रचनेत बदल होऊ शकतो. जीवनमान, तेथील वातावरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाबी कथानकासाठी महत्त्वाच्या असतात. पण तेच कथानक हिंदीत उतरवताना त्याला भारतीय साज चढवत केलेले बदल हे अगदी बेमालूमपणे जमले आहेत. त्यामुळे ही मालिका पाहताना आपल्याच देशातले कथानक पाहात आहोत असे वाटत राहते. कलाकार, चित्रीकरणाची स्थळे ही अगदी योग्य निवडली आहेत.
खरे तर ओलीसनाटय़ हा प्रकार दीर्घकाळ चालणारा नसतो. त्यामुळे चित्रपटात असे कथानक बसवताना तुलनेने सोपे असते. पण तेच जेव्हा मालिकेच्या चौकटीत बसवले जाते तेव्हा त्यातील नाटय़ टिकवून ठेवण्याचे आव्हान असते. त्या कसोटीवर ही मालिका पुरेपूर उतरते. अर्थात त्याचे मूळ श्रेय हे इस्रायली मालिकाकर्त्यांना जाते तेवढेच भारतीय मालिकाकर्त्यांनाही जाते. चाळीस मिनिटांच्या आसपास असणाऱ्या दहा भागांमध्ये पहिला सीझन सध्या प्रदर्शित झाला असून लवकरच दुसरा सीझनदेखील येईल. त्यामुळे सध्यातरी कथानकाची उत्सुकता टिकून आहे.
वेबसीरिजची बाजारपेठ आपल्याकडे जशी विस्तारू लागली तशी अनेक अर्थहीन, रुचीहीन अशा वेबसीरिज घाऊक प्रमाणात येऊ लागल्या. त्यात अगदीच नाव घेण्यापुरत्या सीरिज चांगल्या असायच्या. हॉटस्टारने गाजलेल्या इंग्रजी वेबसीरिजचा हिंदूी रिमेक करायला सुरुवात केली त्यामुळे काही चांगली कथानके भारतीय प्रेक्षकांना पाहता आली. ‘क्रिमिनल जस्टीस’ त्यापैकीच एक आणि आता ‘होस्टेजेस.’ रिमेक करणेदेखील कठीण असले तरी रिमेकवरच विसंबून न राहता चांगले मूळ कथानक देण्यावरदेखील भर देणे गरजेचे आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित करावे लागेल.
- होस्टेजेस
- ऑनलाइन अॅप – हॉटस्टार
- सीझन – पहिला