हृतिक रोशन आपल्या आगामी ‘काबिल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘काबिल’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हृतिक आणि यामी सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून ‘काबिल’ या चित्रपटातून हृतिक हटके भूमिका साकारत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अंध व्यक्तीची भूमिका साकारणाऱ्या ह्रतिकने घड्याळ कसे घातले आहे? असा प्रश्न काहींना पडला होता. या पार्श्वभूमीवर लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय गुप्ता यांची फिरकी घेण्याचाही प्रयत्न केला. ट्रेलरमध्ये अंध ह्रतिकने घड्याळ घातल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांनी संजय गुप्ताला अक्षरश: हैराण करुन सोडले होते. लोकांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ‘काबिल’चे दिग्दर्शक संजय गुप्ताने अखेर मौन सोडले.

ह्रतिकच्या घड्याळाबाबत लोकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर संजय गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे. प्रश्न उपस्थित करणाऱ्या मंडळींना त्यांनी विद्वान म्हणून संबोधले आहे. या ट्विटसोबत ह्रतिकने चित्रपटामध्ये वापरलेल्या घड्याळाचा फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. डीएनएला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय म्हणाला की, काबिलच्या प्रमोशन दरम्यान ह्रतिकने घातलेले घड्याळावर अनेक जणांनी आक्षेप घेतला आहे. अंध व्यक्तिंसाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करुन घड्याळे निर्माण केली जात आहेत. यासंदर्भात अभ्यास करुनच ह्रतिकच्या हातामध्ये घड्याळ वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा आगामी ‘काबिल’ हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत राहिला आहे. ह्रतिकला नवीन वर्षात शाहरुखला टक्कर द्यावी लागणार आहे. ‘काबिल’चा दुसरा ट्रेलर पाहता शाहरुखच्या ‘रईस’ या चित्रपटाला हृतिक चांगलीच टक्कर देण्यासाठी तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. हृतिकच्या ‘काबिल’ या चित्रपटावर कथा चोरीचा आरोपही झाला होता. या चित्रपटात हृतिक रोशन आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका आहे. हे दोघे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. संजय गुप्ता दिग्दर्शित आणि राकेश रोशनच्या निर्मितीत बनलेला हा चित्रपट जानेवारी २०१७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.