‘कोलावरी डी’ या गाण्यामुळे प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता म्हणजे धनुष. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळविल्यानंतर धनुषने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं. त्यामुळे हिंदी चित्रपट रसिकांच्या मनात त्यांनी स्वतंत्र स्थान मिळविलं. ‘रांझणा’, ‘शमिताभ’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकला. त्यानंतर त्याचा बॉलिवूडमध्ये फारसा वावर दिसला नाही. मात्र आता पुन्हा एकदा त्याची पावलं बॉलिवूडकडे वळली आहेत. धनुष लवकरच चित्रपट दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे.

आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटामध्ये धनुष अभिनेता हृतिक रोशन आणि सारा अली खानसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून साराला पहिल्यांदाच हृतिक आणि धनुष अशा दोन सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. मात्र अद्यापतरी या चित्रपटाविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, सध्या या चित्रपटातील मुख्य भूमिकांसाठी कलाकारांच्या नावावर चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद एल राय आणि धनुष दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी या दोघांनी ‘रांझणा’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटामध्ये धनुषसोबत अभिनेत्री सोनम कपूर मुख्य भूमिकेत होती. तर आनंद एल राय यांनी २०१८ मध्ये ‘झीरो’ हा अखेरचा चित्रपट केला होता. त्यांच्या या चित्रपटामध्ये शाहरुख खान, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते.