सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेला अन्यायाविरूध्द आणि समाज व्यवस्थेविरूद्ध लढणारा ‘अँग्री यंग मॅन’ अनेकांना भावला आणि त्यांच्या चाहत्यांची लाट उसळली. अमिताभ बच्चन यांनी मोठा पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ साकारून युवकांच्या मनात खदखद असलेल्या आक्रोशाला वाट मोकळी करून दिली. त्यांच्या या ‘अँग्री यंग मॅन’ने हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व गणिते बदलली आणि बॉलिवूडला एक नवी दिशा मिळाली. आजही आपण ‘अँग्री मॅन’ची भूमिका वठवू शकतो, असे या महानायकाचे म्हणणे आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, काळाबरोबर बदलणे गरजेचे आहे. शाळेत अथवा महाविद्यालयात असलेला उत्साह आणि जोश वाढत्या वयाबरोबर टिकून राहात नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या भूमिकादेखील तुमच्या वयाला साजेशा असतात. याचा अर्थ असा नव्हे की माझ्यातील ऊर्जा संपली आहे, चित्रपटात ‘अँग्री मॅन’ साकारण्याची गरज भासल्यास आजही मी तितक्याच ताकदीने ‘अँग्री मॅन’ची भूमिका वठवू शकतो. हे चित्रपटातील व्यक्तिरेखेवर अवलंबून असते, त्याचप्रमाणे ते दिग्दर्शक आणि कथेवरदेखील अवलूंबन असते.
या ७१ वर्षीय जेष्ठ अभिनेत्याने या वयातदेखील एकाच बाजाच्या भूमिका न साकारता ‘विरुद्ध’ चित्रपटात न्यायासाठी लढणारा पिता, ‘ब्लॅक’ चित्रपटात अंध आणि मुकबधिर मुलीचा शिक्षक, ‘चिनी कम’ चित्रपटात एका आचाऱ्याची तर ‘निःशब्द’ चित्रपटात स्वत:पेक्षा वयाने खूप लहान असलेल्या तरूण मुलीच्या प्रेमात पडलेल्या पुरुषाची आणि ‘पा’ चित्रपटात व्याधिग्रस्त माणसाची व्यक्तिरेखा साकारून आपल्यातील वैविध्यपूर्ण कलाकाराची चुणक दाखवून दिली आहे. वयाच्या या टप्प्यावर ठराविक साच्यातील चरित्र भूमिका साकारण्यापेक्षा नाविन्यपूर्ण भूमिका करायला मिळतात यासाठी अमिताभ बच्चन स्वत:ला भाग्यशाली समजतात. याविषयी बोलताना ते म्हणतात, वाढत्या वयामुळे तुम्ही प्रेमी तरूणाची भूमिका साकारू शकत नाही. स्वाभाविकपणे तुमच्याकडे चरित्रात्मक भूमिका येण्यास सुरूवात होते. जेव्हा तुम्ही वयाचा ७२वा टप्पा गाठता, तेव्हा ओघानेच चित्रपटातील ठराविक प्रकारातील भूमिकांच्या क्षेत्रात तुमची गणना होते.
चार दशकाचा अभिनयाचा प्रवास आणि १८० हून अधिक चित्रपटात काम केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते अमिताभ बच्चन म्हणतात, आजही त्यांना कामाचे ओझे वाटत नाही. ते सकाळी लवकर उठतात तेव्हा सेटवर जाण्यासाठी चैतन्याने आणि उत्साहाने भरलेले असतात.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2014 रोजी प्रकाशित
आजही मी ‘अँग्री मॅन’ची भूमिका साकारू शकतो : अमिताभ बच्चन
सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेला अन्यायाविरूध्द आणि समाज व्यवस्थेविरूद्ध लढणारा 'अँग्री यंग मॅन' अनेकांना भावला आणि त्यांच्या चाहत्यांची लाट उसळली.
First published on: 09-04-2014 at 12:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I can still play the angry man amitabh bachchan