अवघ्या काही दिवसांतच या वर्षाची सांगता होणार आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे वर्ष कसं काय सरसर निघून गेलं हाच प्रश्न अनेकांच्या मनात सध्या घर करु लागला आहे. त्यातही अनेकांच्या मनात रुखरुख आहे ती म्हणजे यंदाच्या वर्षी फसलेल्या संकल्पांची. नवीन वर्ष आणि हटके संकल्प हा जरी आता एक ट्रेंड बनला असला तरीही खूप कमी जणांचे संकल्प पूर्णत्वास जातात हेच खरे. काही कारणास्तव धकाधकीच्या आयुष्यात, रोजच्या धावपळीत सर्व काही निभावून नेताना कळत-नकळत या संकल्पांकडे दुर्लक्ष होतं. पण, तरीही सध्याच्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षासाठी कोणता संकल्प करायचा हा प्रश्न अनेकांच्याच मनात आल्यावाचून राहात नाही. आपल्या नवी वर्षांच्या संकल्पाबद्दल सांगतोय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक हृषीकेश जोशी.
नवीन वर्षाची सुरुवात लवकरच होणार आहे, त्यामुळे ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागताची तयारी देखील सुरु झाली आहे, नववर्षाच्या लेट नाईट पार्ट्याना देखील आता उत येईल. अशावेळी योग्य ते भान ठेवून नववर्षाचा आनंद उपभोगा, असा संदेश मी आजच्या पिढीला देतो. जे कराल ते लक्षपूर्वक आणि काळजी घेऊन करा, जेणेकरून त्यात तुम्हाला यश मिळेल. नवीन वर्षात माझे देखील काही प्लॅन्स आहेत. एक चांगला दिग्दर्शक आणि लेखक म्हणून मला नाव कमवायचे आहे. पुढील वर्षी मी दिग्दर्शित केलेला एक चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. त्याच्याच तयारीत सध्या मी खूप व्यस्त आहे. असे असले तरी, नवीन वर्षाच्या आनंदात जुन्याला विसरून चालत नाही. यंदाचे माझे वर्ष संमिश्र असे गेले. अनेक नवे मित्र यावर्षी मला मिळाले. त्यातलाच एक रितेश देशमुख. स्टार प्रवाह च्या ‘विकता का उत्तर’ या मालिकेच्या शुटींगच्या निमित्ताने माझा रितेशशी संपर्क आला. तो एक चांगला माणूस असून, आम्ही चांगले मित्र बनलो आहोत. पुढील वर्षी देखील अशीच नव्या लोकांशी भेटीगाठी वाढत राहो, अशी माझी इच्छा आहे.