जेव्हा जेव्हा सलमान खानच्या लग्नाचा विषय येतो तेव्हा तेव्हा ती आपली वैयक्तिक बाब असल्याचे सांगून तो मोकळा होतो. मात्र, गुरुवारी ‘धूम ३’ चित्रपटाच्या शीर्षकगीत प्रकाशनसोहळ्याच्या निमित्ताने कतरिनाच्या उपस्थितीत ओघाओघाने आमिरकडे सलमानचा विषय निघाला. तेव्हा सलमान आणि कतरिनाला वास्तव आयुष्यातही एकत्र पाहण्याची माझी इच्छा आहे, असे आमिरने जाहीरपणे सांगितले. आमिरच्या एकूणच मनमोकळ्या स्पष्टोक्तीनंतर कतरिनाची दांडी गुल झाली.
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवणाऱ्या कतरिनाने याआधीच सलमान आणि शाहरूख या दोन खानांबरोबर काम केले आहे. ‘धूम ३’ च्या निमित्ताने ती पहिल्यांदाच आमिरबरोबर काम करते आहे. त्यामुळे त्या तिघांबरोबरचा तिचा अनुभव कसा होता?, असे विचारले असता शाहरूखबरोबर मला का कोण जाणे अवघडल्यासारखे होते. तर सलमान  मला वैयक्तिकरित्या ओळखत असल्याने त्याच्याबरोबर काम करणे कधीच अवघड नसते, अशी स्पष्ट कबुली कतरिनाने दिली. मात्र, याच गप्पांच्या ओघात जेव्हा विषय सलमानच्या लग्नाकडे वळला तेव्हा आमिरनेच पुढाकार घेत या दोघांनी वास्तवातही एकत्र यावे असे मला वाटते पण, माझ्या या वाटण्याने काही फार फरक पडणार नाही आहे, असे सांगून टाकले.