चंदेरी दुनियेतून मिळणारी प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी आजही कित्येक जण आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसतात. परंतु त्यात काही थोडेच जण असतात ज्यांना आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळते. आणि त्यातूनही एद्रीस एल्बासारखे काही मोजकेच असतात जे मिळालेल्या संधीचे सोने करतात. परंतु त्याचा हा प्रवास इतर मोठय़ा कलाकारांप्रमाणेच खडतर होता. त्याला अनेकांचा विरोध आणि संकटे सहन करावी लागली. अनेकदा त्याच्या योग्यतेवर प्रश्नचिन्हे उपस्थित केली गेली. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एद्रीसने हॉलीवूड सिनेसृष्टीत स्वत:ची जागा निर्माण केली. परंतु अभिनेता बनण्याच्या प्रवासाला त्याच्या घरातूनच विरोध झाला होता. एल्बाच्या वडिलांना तो अभिनेता बनू शकेल असे कधीच वाटले नव्हते. त्याच्याकडे असलेल्या कलेची आणि सर्जनशीलतेची त्यांना जाण होती. पण दृश्यमाध्यमांत श्रीमंतांची मक्तेदारी असून सर्वसामान्यांची यात नोंद घेतली जात नाही. अशा समजुतीमुळे त्यांनी विरोध केला होता. स्वप्नांच्या विश्वात रमण्यापेक्षा वास्तविक जगाचे भान ठेवून आपला पारंपरिक व्यवसाय त्याने पुढे न्यावा ही त्याच्या वडिलांची इच्छा होती. स्टीव्ह जॉब्ज, थॉमस अल्वा एडिसन, स्टीव्हन स्पिलबर्ग, बिल गेट्स यांसारख्या मोठमोठय़ा व्यक्तिमत्त्वांना आदर्श मानणारा एल्बा वडिलांशी सहमत नव्हता. शाळेत असताना त्याच्या शिक्षकांनी एक दिवस तो मोठा अभिनेता म्हणून नावारूपाला येईल हे दाखवलेले स्वप्न उराशी बाळगून त्याने अभिनय सृष्टीत पहिले पाऊल ठेवले. आज ‘बेले मॅनमॅन’, ‘अॅव्हेंजर एज ऑफ अल्ट्रॉन’, ‘वन लव्ह’, ‘विक्स लेटर’, ‘प्रॉम नाईट’, ‘द गनमॅन’यांसारख्या ५०पेक्षा जास्त चित्रपटांत काम करणाऱ्या एद्रीस एल्बाने एक उत्तम अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या मते वडिलांना त्याच्याबद्दलचा असलेला अभिमान पाहून आनंद होतो. पण त्यांचे जुने उपदेश आठवले की त्याला हसू आवरत नाही. त्याच्या आईने त्याला हवेत उडण्याचा मंत्र दिला. पण वडिलांनी वास्तवाचे भान दिले. जर वडिलांनी त्याला विरोध केला नसता तर आपले स्वप्न पूर्ण करण्याची प्रबळ इच्छा आपल्या मनात कधीच निर्माण झालीच नसती असं तो मानतो.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2017 रोजी प्रकाशित
वडिलांचा विरोधच त्याच्या यशाचा मंत्र..
एद्रीस एल्बासारखे काही मोजकेच असतात जे मिळालेल्या संधीचे सोने करतात.
Written by मंदार गुरव

First published on: 20-08-2017 at 03:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idris elba hollywood katta part