माझं स्वातंत्र्यावर हेच म्हणणं आहे की आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का? यावर मी एक शॉर्टफिल्मही बनवली होती. सगळ्यात आधी भारतात राजेशाही होती. त्यानंतर इंग्रज आले आणि ते गेल्यानंतर आता राजकारणी आले आहेत. मग आपल्याला स्वातंत्र्य कुठे मिळालं?
आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली पण मध्यमवर्गीयांच्या समस्या अद्याप तशाच आहेत. आपलं सरकार आपल्यावर अनेक नियम, अटी लागू करतं. पण त्यावर आपण अजूनही खुलून बोलत नाही. यावर पर्याय म्हणून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतो. अनेक लोक सोशल मीडियावर आपली मतं मांडतात. त्यामुळे अनेकांना आपल्याला ‘फ्रिडम ऑफ स्पीच’ मिळालं आहे असं वाटतं. पण केवळ चर्चा करून काही होणार नाही. तर कृतीही व्हायला हवी. बजेट आलं की त्याची चर्चा होते, निवडणूका आल्या की त्याचीही चर्चा सोशल मीडीयावर होते. पण सामान्य नागरिक त्यावर काहीच कृती करताना दिसत नाही. आज आपल्याकडे राजकीय नेत्यांचं राज्य आलंय. आपण त्यांच्याप्रमाणे वागतोय, मग कुठे आहे स्वातंत्र्य? इंग्रज भारतात आले पण त्यांच्यामुळे काही चांगल्या गोष्टीही आपल्या येथे घडल्या आहेत. त्याकाळी आपल्याकडे रस्तेही नव्हते तेव्हा ब्रिटनला ट्रेन चालत होती. आज आपल्याकडेही प्रगती झालेली दिसतेय. माझ्या शॉर्टफिल्ममधून नक्कीच तुम्हाला आपला देश खरंच स्वतंत्र झाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यात मी दाखवलंय की, ‘एक मुलगा सिग्नलवर झेंडे विकत असतो. तेव्हा एक गाडीवाला त्याला विचारतो तुला आज काय आहे ते माहित आहे का, त्यावर तो मुलगा नाही म्हणतो. हाच प्रश्न नंतर तो आपल्या मित्राला विचारतो तेव्हा आज आपला देश स्वतंत्र झाला होता असे तो सांगतो. इंग्रजांनी आपल्या देशातील सर्व संपत्ती लुटल्याने आपण गरीब झालो होतो. पण आजच्या दिवशी आपण इंग्रजांना पळून लावलं. आज आपल्या देशात किती पैसा आहे बघ. या मोठ्या इमारती, गाड्या आपण बघतोय. त्यावर तो मुलगा म्हणतो, अरे रस्त्यावर गाड्या धावताना दिसतात. देश श्रीमंत झाला आहे. पण आपण तर अजून गरीबच आहोत.अजूनही आपल्याला भीक मागावीच लागतेय. चल सोड यार..’.