सध्याच्या घडीला भारत असहिष्णू बनला आहे. मी एखाद्या धार्मिक ग्रंथातील विचार मांडला तर प्रसारमाध्यमांकडून मला लगेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस) लेबल लावले जाते, अशी व्यथा नितीश भारद्वाज यांनी बोलून दाखविली आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात बी.आर. चोप्रा दिग्दर्शित ‘महाभारत’ मालिका ही मैलाचा दगड ठरली होती. या मालिकेत नितीश भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची अजरामर व्यक्तिरेखा साकारली होती. नितीश भारद्वाज आगामी ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटात दुर्जन ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. यानिमित्ताने त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत देशातील असहिष्णुतेच्या मुद्द्यासह अनेक विषयांवर भाष्य केले.

यावेळी त्यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला भारत असहिष्णू बनला आहे. मी एखाद्या धार्मिक ग्रंथातील विचार मांडला तर मला लगेच आरएसएसचे लेबल लावले जाते. देशातील जनता आणि प्रसारमाध्यमे एखाद्या अस्सल भारतीय गोष्टीचा संबंध लगेच आरएसएसशी का जोडतात? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. माझ्या वाचनाच्या बळावर मी काही गोष्टी मांडतो. त्यांचा आरएसएसशी कोणताही संबंध नाही. तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काही बोलायचे असेल तर तुम्ही आरएसएसशी संबंधित आहात का, असा प्रश्न विचारला जातो. समाजातील तथाकथित उदारमतवादी,  पेस्युडो बुद्धिवादी  आणि प्रसारमाध्यमांकडून अशाप्रकारची लेबल्स लावली जातात. त्यामुळे देशात इतर दृष्टीकोन आणि विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उरले नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे, असे नितीश भारद्वाज यांनी सांगितले.
गेली कित्येक वर्षे कम्युनिस्ट, काँग्रेस समर्थक आणि इतिहासकारांकडून शालेय अभ्यासक्रमासाठीची पाठ्यपुस्तके लिहली जात आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना नेहमी विविध विचार आणि दृष्टीकोन  अभ्यासण्याची संधी दिली पाहिजे. तुम्ही एखादा विचार सातत्याने इतरांच्या गळी उतरवू शकत नाही, असे मत यावेळी त्यांनी मांडले.