पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या भाषणादरम्यान मोदींनी ‘आत्मनिर्भर’ या शब्दाचा अनेकदा उच्चार केला. या शब्दावरुन विरोधकांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. विरोधकांमध्ये आता दिग्दर्शक ओनिर देखील सामिल झाला आहे. ‘आत्मनिर्भर’ या शब्दावरुन त्याने सरकारवर निशाणा साधला आहे. ओनिरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये काही गरीब मजुर चक्क बिस्कीटांसाठी झटापट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कुठल्याश्या रेल्वे स्टेशनवरील आहे. या मजुरांच्या हातात एक बिस्कीटांची पिशवी आहे. ही पिशवी फाडून बिस्कीटं मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा व्हिडीओ पोस्ट करुन “याला आपण ‘आत्मनिर्भर’ भारत म्हणायचं का?” असा प्रश्न ओनिरने विचारला आहे.
“Aatma Nirbhar Bharat” https://t.co/VX2GOVrdXJ
— Onir (@IamOnir) May 14, 2020
ओनिर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर तो नेहमीच प्रतिक्रिया देतो. या पार्श्वभूमीवर त्याने केलेलं हे ट्विट सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. भाषण करताना काय म्हणाले होते मोदी? करोनापूर्वीचे आणि नंतरचे जग बदललेले असेल. अशा वेळी विश्वाला पुढील मार्ग दाखवण्याचे काम भारताला करावे लागेल. करोनाआधी भारताकडे पीपीई, एन-९५ मास्क नव्हते. दररोज आता २ लाख पीपीई, २ लाख एन-९५ मास्क बनवले जात आहेत. जागतिकीकरणात आत्मनिर्भरतेचा अर्थ बदललेला असेल. त्या अर्थाने २१ शतक भारताचेच असेल. भारत विश्वाला कुटुंब मानतो. देशाची आत्मनिर्भरता आत्मकेंद्रित कधीच नव्हती. टीबी, कुपोषण, पोलिओ विरोधातील लढा जगावर प्रभाव टाकतो. भारताची औषधे जगाला नवी आशा देतात. जग भारताची प्रशंसा होते. मानवजातीच्या कल्याणासाठी १३० कोटी देशवासीयांचा आत्मनिर्भर होण्याचा संकल्प विश्वाला बरेच काही देऊ शकतो, असं मोदी जनतेशी संवाद साधताना म्हणाले.
