या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवासाठी निवड शहरी जगण्यात आपल्या आजूबाजूला खूप काही घडत असतं. या घडामोडी कळत नकळत आपल्या शरीरातही मुरतात आणि आपलं शरीरही शहर होऊन जातं. शरीराचं शहर होण्याचं हे नाटय़ ‘इन ट्रान्झिट’ या नाटकाद्वारे रंगमंचावर आलं आहे. या अनोख्या नाटय़कृतीची श्रीलंकेतील कोलंबो इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवासाठी निवड झाली आहे. या महोत्सवांतर्गत या नाटकाचा प्रयोग ३१ मार्च आणि ६ एप्रिल रोजी श्रीलंकेत होत आहे.

महोत्सवात श्रीलंका, जर्मनी, स्वीडन, फ्रान्स, बेलारूस आदी देशांतील नाटकं सादर होणार आहेत. या पूर्वी या महोत्सवात पुण्यातून ध्यास संस्थेचे श्रीकांत भिडे दिग्दíशत ‘द लास्ट कलर’,  विद्यानिधी वनारसे दिग्दíशत ‘काफिला’ अशी काही नाटकं सादर झाली आहेत. मूळची आरजे असलेल्या आदिती वेंकटेश्वरनं या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकात आदितीसह तन्वी हेगडे, राधिका राठोड आणि अंकिता िशघवी यांचा सहभाग आहे. नृत्य शैली आणि नॉन व्हर्बल प्रकारातलं हे नाटक आहे. अ‍ॅन मायकल यांच्या ‘सो मच ऑफ अवर सिटी इज इन अवर बॉडी’ या वाक्यातून हे नाटक साकारलं आहे. नाटकामध्ये रुढार्थानं असलेली गोष्ट या नाटकात नाही. मात्र, रोजच्या जगण्यातून आपल्या शरीराचं काय होतं याचा विचार या नाटकातून मांडण्यात आला आहे. आयपार या संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. विद्यानिधी वनारसे यांनी प्रकाश योजना आणि उदयन धर्माधिकारी यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. पुणेकरांना २४ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृहात या नाटकाचा प्रयोग पाहता येईल.

शरीराचं शहर होण्याचा विचार मांडणाऱ्या या नाटकाबाबत आदितीनं ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ‘हे नाटक पारंपरिक पद्धतीचं नाही. त्यामुळे याला नाटक म्हणावं की नाही हेही नीट सांगता येणार नाही. मुव्हमेंट थिएटर पद्धतीची ही नाटय़कृती आहे. कोलंबो थिएटर फेस्टिव्हलसारख्या महत्त्वाच्या नाटय़महोत्सवासाठी आमच्या नाटकाची निवड होणं आनंददायी आहे,’ असं तिनं सांगितलं.

‘नऊ र्वष आरजे म्हणून काम केल्यानंतर स्वत:ला वेळ देता येत नसल्याचं जाणवलं. माझी नाटकनृत्याची आवड जपायलाही मर्यादा येत होत्या. म्हणून थोडा धाडसी निर्णय घेऊन नोकरीला रामराम केला. दीड वर्ष विविध ठिकाणी फिरले. कर्नाटक, भूतान, लडाख अशा विविध भागांतील नाटय़संस्थांना भेटी दिल्या. स्वत:ला वेळ दिला. आता पूर्णवेळ नाटक आणि नृत्यासाठी देत आहे. हे सगळं करताना मला खूप छान वाटतंय,’ असंही ती म्हणाली.

Chinmay.reporter@gmail.com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International theater festival
First published on: 23-03-2017 at 02:52 IST