इरफान खान या वर्षअखेरीस परतणार?

एप्रिलमध्ये इरफानला ‘न्यूरोएंडोक्राईन’ या रोगाचे निदान करण्यात आले.

इरफान खान

मुंबई : यशाच्या शिखरावर असताना दुर्धर आजाराचा फटका बसल्याने सध्या रुपेरी पडद्यापासून दूर असलेल्या अभिनेता इरफान खानने पुन्हा एकदा आपल्या आजारपणाबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. एप्रिलमध्ये इरफानला ‘न्यूरोएंडोक्राईन’ या रोगाचे निदान करण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी इरफान लंडनला रवाना झाला. अजूनही त्याच्यावरचे उपचार सुरू असून तो निश्चितपणे कधी बरा होईल, याची माहिती नाही. मात्र इरफानच्या निकटवर्तीयांनी उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत फरक पडला असून या वर्षांच्या अखेरीस तो पुन्हा मायदेशी परतेल, असे म्हटले आहे.

देशापासून आणि चित्रपटांपासून दूर असला तरी इरफान मध्ये मध्ये स्वत: समाजमाध्यमांवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो आहे. आताही तीन दिवसांपूर्वी त्याने आपली मानसिक स्थिती अत्यंत मोकळेपणाने चाहत्यांसमोर ठेवली. या आजाराचा इरफानला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. याबद्दल उपचारासाठी लंडनला रवाना होण्यापूर्वीच इरफानने कबूल केले होते. आताही अजून तो या सगळ्या लढाईतून बाहेर आलेला नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. ज्या आजाराबद्दल कधीच माहिती नव्हती असा एक शब्द आपल्या शब्दकोशात दाखल झाला. हा आजार कोणीच ऐकलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर उपचाराचे प्रयोगही आपल्यावरच होत आहेत, असे इरफानने म्हटले आहे. लंडनमध्ये रुग्णालयाच्या खिडकीतून समोर लॉर्ड्सचे मैदान दिसते. या दोघांच्या मधून एक रस्ता जातो. सध्या बाहेरच्या जगाशी त्याचा असलेला हा एक मेव संपर्क आहे. या खिडकीतून लॉर्ड्सकडे पाहताना आयुष्याचा खेळ आणि मृत्यूचा खेळ म्हणजे काय हे जाणवले असल्याचे तो म्हणतो.

आपल्या आजाराबद्दल फारशी माहिती नसल्याने उपचारांची अनिश्चितता जास्त आहे आणि हीच जाणीव त्याला अस्वस्थ करते आहे. मात्र त्यामुळे या उपचारांचा परिणाम काय होईल, याचा अजिबात विचार न करता ही परिस्थिती स्वीकारली आहे, मी त्याला शरण आलो आहे, असेही त्याने म्हटले आहे. इथून पुढे आठ महिने, दोन वर्ष.. आयुष्य मला नेमकं कुठे घेऊन जाणार आहे, याची कल्पना नाही, असं म्हणणाऱ्या इरफानने आपल्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.

मी ज्यांना ओळखतो आणि ज्यांना ओळखतही नाही अशा अनेक व्यक्ती माझ्यासाठी ठिकठिकाणाहून आज प्रार्थना करतायेत. त्यांच्या या प्रार्थना एक झाल्या आहेत आणि त्यांची ताकद माझ्या पाठीच्या कण्यातून आत शिरते आहे आणि पार वरती डोक्यावर असलेल्या मुकुटापर्यंत पोहोचली आहे, असं वाटत असल्याचंही इरफाननं सांगितलं. इरफानच्या मित्राने मात्र त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधार पडत असल्याचं म्हटलं आहे.

इरफान उपचारासाठी देशाबाहेर असला तरी या वर्षी त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्या माध्यमातून का होईना तो आपल्या चाहत्यांसमोर असणार आहे. त्याचा ‘कारवाँ’ हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेता डुलकेर सलमान हा बॉलीवूडमध्ये प्रवेश करतो आहे, तर मराठी अभिनेत्री मिथिला पालकर हिचाही हा पहिला हिंदी चित्रपट आहे. त्याआधी ‘पझल’ हा त्याचा आंतरराष्ट्रीय चित्रपट १३ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Irrfan khan on the way to recovery will return by year end

ताज्या बातम्या