अभिनेता अक्षय कुमार नेहमीच्या त्याच्या विविध धाटणीच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत असतो. २०१७ या वर्षातही अक्षय अशाच काही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटांचे काही हटके पोस्टरही अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही दिवसांपूर्वीच शेअर केले. यांपैकीच एक म्हणजे त्याचा आगामी चित्रपट ‘पॅडमॅन’. या चित्रपटाचे नाव जितके वैविध्यपूर्ण आहे तितकेच या चित्रपटाचे कथानकही नव्या धाटणीचे असणार आहे अशी चर्चा सध्या चित्रपट वर्तुळामध्ये रंगत आहे. अरुणाचलम मुरुगनाथम या खऱ्याखुऱ्या ‘पॅडमॅन’च्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर आणि स्वस्त सॅनिटरी पॅड बनविणाऱ्या या व्यक्तिच्या खडतर प्रवासावर चित्रपटाचे कथानक बेतले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अद्यापही निश्चित झाली नसली तरीही चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मात्र कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय.
अक्षयच्या या चित्रपटासाठी कोणत्या अभिनेत्रीच्या नावाला प्राधान्य दिले जाणार याबद्दल अनेकजण अंदाज बांधत असतानाच सरतेशेवटी या चित्रपटातील अभिनेत्रींच्या नावारुन पडदा उठला आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटे अक्षयसोबत त्याच्या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. सोनमने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली. राधिकानेसुद्धा या चित्रपटासंबाधीचा एक फोटो रिट्विट करत सर्वांचेच लक्ष वेधले.
Thrilled to be a part of this prestigious project. #rbalki @akshaykumar @missfunnybones… https://t.co/1KMKlz1wxw
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) January 10, 2017
एखाद्याच्या प्रोत्साहनपर जीवनप्रवासापासून प्रेरणा घेत चित्रपट बनविण्याला अक्षय कुमारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यातच आता या नव्या चित्रपटाचीही भर पडत आहे. या चित्रपटाची निर्मिती ट्विंकल खन्ना करत आहे. दरम्यान, खिलाडी कुमार सध्या ‘जॉली एल.एल.बी. २’ या चित्रपटात व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये अक्षय एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारसोबतच या चित्रपटामध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी, सौरभ शुक्ला हे कलाकारही झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची दाद मिळविली होती. त्यामुळे या चित्रपटालाही प्रेक्षकांची दाद मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. १० फेब्रुवारीला खिलाडी कुमारचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
#PadMan #2017 pic.twitter.com/XUOEcMKVGI
— Akshay Kumar (@akshaykumar) January 1, 2017