करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघातक विषाणूची चैन तोडण्यासाठी सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन आता आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. परंतु लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने दारुची दुकानं आणि पानाची दुकानं सुरु करण्याची सशर्त संमती दिली आहे. याबाबत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“लॉकडाउनच्या काळात दारुची दुकानं सुरु ठेवली तर त्याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील. दारुमुळे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं वाढली आहेत. लहान मुलं आणि महिलांसाठी हा निर्णय त्रासदायक ठरु शकतो.” अशा आशयाचे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे प्रमाणे दारू, पान गुटखा व तंबाखू विकणाऱ्या दुकानांनी ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवायचे आहे. तसंच एकावेळी पाच पेक्षा जास्त लोक दुकानात नसतील याचीहीही खबरदारी घ्यायची आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की याबाबत विभागाकडून कुठल्याही सूचना देण्याऐवजी, दारूची दुकाने सुरू करायची का नाहीत हा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोडण्यात येईल. कारण या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरच्या नेमक्या परिस्थितीचे अधिक चांगले आकलन आहे. राज्यशासनाने टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर काही बिअर व दारू बनवणाऱ्या उद्योगांनी उत्पादन सुरू केले आहे.