scorecardresearch

“…की ते उघडं नागडं होऊन समोर येतं”; किरण माने प्रकरणावरुन आव्हाडांचा स्टार प्रवाहवर पुन्हा एकदा हल्लाबोल

अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून काढून टाकल्याच्या प्रकरणामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरुन हल्लाबोल करत स्टार प्रवाह वाहिनीवर टीका केलीय. यापूर्वीही आव्हाड यांनी या प्रकरणामध्ये किरण मानेंची बाजू घेतली होती. यावेळेस त्यांनी वाहिनीने पाठवलेलं पत्र पोस्ट करत पत्राची तारीख आणि पत्र पोस्ट केल्याच्या तारखेतील […]

awhad tweet
ट्विटरवरुन साधला निशाणा

अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून काढून टाकल्याच्या प्रकरणामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरुन हल्लाबोल करत स्टार प्रवाह वाहिनीवर टीका केलीय. यापूर्वीही आव्हाड यांनी या प्रकरणामध्ये किरण मानेंची बाजू घेतली होती. यावेळेस त्यांनी वाहिनीने पाठवलेलं पत्र पोस्ट करत पत्राची तारीख आणि पत्र पोस्ट केल्याच्या तारखेतील तफावत दाखवत ट्विट केलंय. त्यांनी वाहिनीने पाठवलेलं पत्राचा फोटो पोस्ट करत या पत्रावरुन किरण माने चुकलेला नाही असं म्हटलंय.

आव्हाड यांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेची निर्माती कंपनी असणाऱ्या ‘पॅनरोमा एन्टटर्नेमेंट’ने पाठवलेल्या पत्राचा आणि ते पत्र पाठवताना केलेल्या रजिस्टर पोस्टच्या लिफाफ्याचा फोटो पोस्ट केलाय. “किरण मानेला प्रोडक्शन हाऊसने कुठल्याही प्रकारचे लेखी समजपत्र असे काहीही दिलेले नव्हते. हे मी स्टार प्रवाहला बोलून दाखवल्यानंतर आज किरण मानेला एक पत्र रजिस्टर पोस्टाने आलं. त्याच्यावरती रजिस्टर पोस्ट केल्याची तारीख २१ आहे आणि पत्र लिहिण्याची तारीख १३ आहे. इतकं खोटं करायचं की ते उघडं नागडं होऊन समोर येतं. म्हणजे याचा अर्थ किरण माने चुकलेला नाही,” असं आव्हाड हे फोटो शेअर करत म्हणालेत.

अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकल्यावरून सध्या सोशल मीडियावर आणि त्यासोबतच राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटल्याचं यापूर्वीच पहायला मिळालं आहे. माने यांनी सोशल मीडियावर सातत्याने मांडलेल्या राजकीय भूमिकांमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचं सांगण्यात आलं तर दुसरीकडे मालिकेच्या सेटवरील वर्तवणुकीचं कारण देत मानेंवर कारवाई करण्यात आल्याचा दावा प्रोडक्शन हाऊसने केला होता. यानंतर आव्हाड यांनी वाहिनीला तसेच प्रोडक्शन हाऊसला इशारा दिला होता.

“स्टार प्रवाहावरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मीडियावर लिहितो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून अचानक मालिकेतून काढून टाकले आहे. या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे, निळू फुले या कलाकारांनी कधी टीका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासतो. तुमच्या विरोधात लिहिले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही. स्टार प्रवाहने एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी यात पडायची गरज नव्हती,” असं आव्हाड यापूर्वीच म्हणालेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad slams star pravah for removing kiran mane from porgi zali ho serial scsg

ताज्या बातम्या