‘बघतोय काय मुजरा कर’ या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. या सिनेमात शिवाजी महाराजांना एका वेगळ्याच पद्धतीने मुजरा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर गड किल्यांच्या संवर्धनासाठीदेखील यातील कलाकार पुढाकार घेताना दिसत आहेत. हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा असल्याने यासाठी हेमंत फारच उत्सुक आहे. नुकतेच या सिनेमाचे अजून एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

फेसबुकवर या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करताना त्यांला छानसा मेसेजही लिहिला आहे. ‘मनगटातली ताकद अन हृदयातली आग, इतिहास नवा रचतील शिवबाचे वाघ! सादर करतो वणव्याची पहिली ठिणगी…’ अशा तडफदार शब्दांमध्ये या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर पाहता आपल्याला सिनेमात नक्कीच काहीतरी भन्नाट कथानक पाहायला मिळणार याचा अंदाज येतो.

मराठी माणुस असं म्हटलं की त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं नित्सिम प्रेम डोळ्यांसमोर येतं. देवावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा या नावावरही लोकं करतात. पण त्याहून अर्धा टक्का जरी काळजी महाराजांनी मेहनतीने बांधलेल्या गड, किल्ल्यांची घेतली असती तर आज महारांपेक्षा खूश दुसरे कोणीच नसते.

हेमंत ढोमेच्या ‘बघतोस काय मुजरा कर’ या आगामी सिनेमामध्येही काहीसा हाच आशय घेण्यात आला आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंतनेच केलं असून या सिनेमात जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून उत्तम सिनेमॅटोग्राफीचे दर्शन या काही मिनिटांच्या टिझरमध्ये होते. यात महाराष्ट्रातले गड किल्ले यांची सध्या झालेली दुरावस्था तर दुसरीकडे इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही झाले आहे. त्यामुळे जर संहिता चांगली असेल तर आता मराठी सिनेमाही सातासमुद्रापार जाण्यासाठी धजावत नाही हेच दिसून येतंय. प्रथमदर्शनी टिझर, गाणे आणि पोस्टर्स पाहिल्यानंतर या सिनेमाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे यात काही शंका नाही. पुढच्या वर्षी ३ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.