एका तरुणीने शनिवारी रात्री हॉटेलच्या टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमधील जोधपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. ही तरुणी फॅशन मॉडेल आहे. तिने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी तिच्या वडिलांना फोन केल्याचीही माहिती समोर आली आहे. गुनगुन उपाध्याय असं या तरुणीचं नाव आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गुनगुन उपाध्याय ही महिला फॅशन मॉडेल असून ती जोधपूर शहरातील रहिवासी आहे. शनिवारी ती उदयपूरहून जोधपूरला परतली होती. त्याच रात्री तिने जोधपूरच्या रतनदा भागातील हॉटेल लॉर्ड्स इनच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. टेरेसवरून उडी मारण्यापूर्वी, गुनगुनने तिच्या वडिलांना फोन केला आणि ती आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तसेच तिने वडिलांना शेवटचं मला पाहून घ्या म्हणत तिच्या चेहऱ्याकडे पाहण्यास सांगितले.

हे ऐकून गुनगुनचे वडील गणेश उपाध्याय यांना धक्का बसला आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी ती असलेल्या हॉटलचा शोध घेतला आणि तिथे पोहोचले. मात्र, पोलीस तिथे येण्यापूर्वीच गुनगुनने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली होती. गुनगुनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिचे पाय आणि छाती फ्रॅक्चर झाली आहे. तसेच तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, गुणगुणने आत्महत्येसारखे पाऊल कशामुळे उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. गुनगुन सध्या बेशुद्ध आहे. ती शुद्धीवर आल्यानंतरच तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.