बॉलिवूड कलाकारांकडे महागड्या आणि लग्झरी गाड्यांचे कलेक्शन असणे काही नवीन नाही. पण अभिनेता जॉन अब्राहमकडे असलेल्या बाइकचे कलेक्शन पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. नुकताच जॉनने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जॉनचे बाईक कलेक्शन दिसत आहे. यामध्ये कावासाकी निन्जा ZX-14 R (Kawasaki Ninja ZX-14 R) पासून ते एप्रीलिया RSV4 RF (Aprilia RSV4 RF) अशा महागड्या बाइक्सचा समावेश आहे.
नुकताच जॉनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जॉन स्वत: त्याच्याकडे असलेल्या बाइकचे कलेक्शन दाखवत आहे. या बाइक कलेक्शनमध्ये सुरुवातीला जॉनने कावासाकी निन्जा ZX-14 R दाखवली आहे. या बाईकला ४ सिलेंडर असून १४४१ सीसी इंजिन आहे. त्यानंतर जॉनने त्याच्याकडील एप्रीलिया RSV4 RF (Aprilia RSV4 RF) ही बाइक दाखवली आहे. बाइक चालवताना हलकी वाटावी म्हणून जॉनने तिला एससी एक्जॉस्ट लावून घेतला आहे.
याव्यतिरिक्त जॉनने नुकताच Yamaha – the YFZ-R1 ही बाइक घेतली आहे. तसेच व्हिडीओमध्ये Ducati Panigale V4, MV Agusta F3 800, वी-मॅक्स या बाइक सुद्धा असल्याचे दिसत आहे. बाइकचा हा व्हिडीओ शेअर करत जॉनने छान असे कॅप्शन दिले आहे.
नुकताच जॉनचा ‘पागलपंती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेता अनिल कपूर, पुलकित सम्राट, उर्वशी रौतेला हे कलाकार झळकले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवी तितकी कमाई केली नाही.