‘वर्ल्ड रेस्टलिंग एन्टरटेन्मेंट’ (डब्ल्यू डब्ल्यू ई) या टीव्ही मालिकेतून घराघरांत पोहोचलेला जॉन सीना हा खेळ मनोरंजन क्षेत्रातील सर्वात आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. चाहत्यांना ‘द चँप इज हिअर’ या गाण्यावर नाचवणाऱ्या जॉनने गेल्या काही वर्षांत ‘द मरिन’, ‘१२ राऊं ड’, ‘डॅडीज होम २’, ‘द वॉल’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आणि आपल्या प्रत्येक चित्रपटातून ‘नेव्हर गिव्ह अप’ हा मंत्र देणारा ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ सुपरस्टार  जॉन सीना आता ‘ट्रान्सफॉर्मर्स’ या चित्रपट मालिकेतील सहाव्या भागात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘बम्बलबी’ असे ठेवण्यात आले आहे. ‘ट्रान्सफॉर्मर्स’ चित्रपट मालिकेतील ‘बम्बलबी’ या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.  १९८४ साली टकारा टॉमी यांनी लहान मुलांसाठी ‘ट्रान्सफॉर्मर्स’ या कार्टून कॉमिक्सची निर्मिती केली. ‘ट्रान्सफॉर्मर्स’ हे गाडय़ांपासून तयार झालेल्या रोबोट्सचे विश्व आहे. यात इतर सुपरहिरो मालिकांप्रमाणेच चांगल्या व वाईट शक्ती असतात. त्यांचा सातत्याने एकमेकांशी संघर्ष होत असतो. आणि शेवटी सर्वज्ञात तत्त्वज्ञानाप्रमाणे सत्याचा असत्यावर विजय होतो, अशी एक सर्वसाधारण मांडणी या कार्टूनमध्ये केली गेली. पुढे त्याची वाढत गेलेली लोकप्रियता पाहता दिग्दर्शक मायकल बेने त्यावर कार्टून मालिका व चित्रपट तयार केले गेले. सुरुवातीला फक्त लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून ‘ट्रान्सफॉर्मर्स’ची निर्मिती केली जात होती, परंतु पुढे त्यात केली गेलेली मांडणी, अ‍ॅक्शन दृश्ये आणि अवाक करणारे ग्राफिक पाहून लहान मुलांबरोबरच प्रौढ प्रेक्षकवर्गदेखील ‘ट्रान्सफॉर्मर्स’च्या दिशेने आकर्षित झाला. कोणताही सुपरस्टार नसतानाही केवळ पटकथा, दिग्दर्शन आणि ग्राफिकच्या जोरावर ‘ट्रान्सफॉर्मर्स’ चित्रपट मालिकेने खोऱ्याने पैसा ओढला. परंतु, गेल्या काही काळात अ‍ॅनिमेशन तंत्रज्ञानात इतकी झपाटय़ाने प्रगती झाली की ‘कोको’सारख्या लहान बजेटच्या चित्रपटांनीही ऑस्कपर्यंत मजल मारली. शिवाय येत्या काळात ‘आयर्न मॅन’, ‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘ब्लॅक पँथर’ यांसारख्या बिगबजेट सुपरस्टार सुपरहिरोंची लाट आहेच. आणि या बदलत्या काळात टिकायचे असेल तर आपल्याही हातात एखादा तरी सुपरस्टार असावा हा भविष्यकालीन विचार करून त्यांनी जॉन सीनाची निवड केली असल्याची शक्यता आहे. ‘डब्ल्यू डब्ल्यू ई रेसलमॅनिया’मध्ये होणाऱ्या ‘अंडरटेकर’विरुद्धच्या सामन्यामुळे जॉन सीना सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ मालिकेच्या नवीन धोरणांनुसार त्यांच्याबरोबर करारबद्ध झालेला कोणताही खेळाडू जर चित्रपटात काम करत असेल तर ‘डब्ल्यू डब्ल्यू ई’ मार्फत त्या चित्रपटाची मोफत जाहिरात केली जाते. कारण त्यात काम करणारा खेळाडू त्यांच्याच मालिकेतील असल्यामुळे त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपसूक त्यांचीही जाहिरात होत असते. शिवाय, जॉन सीना हा सुमार दर्जाचा अभिनेता जरी असला तरी सध्या गुगल सर्च इंजिनवर सर्वात जास्त शोधल्या जाणाऱ्या सुपस्टारपैकी एक आहे. आणि या सर्व पाश्र्वभूमीचा विचार करता ‘ट्रान्सफॉर्मर्स’ निर्मात्यांनी जॉन सीनाची केलेली निवड योग्यच आहे, असे म्हणावे लागेल.