दिग्दर्शक डेविड धवन यांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नवीन पद्धतीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. सलमान खानच्या प्रसिद्ध जुडवा चित्रपटाच्या सिक्वलमधुन धवन पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. डेविड धवन यांचा आगामी चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. ‘जुडवा २’ या चित्रपटात वरुण धवन दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘ढिशूम’ या चित्रपटानंतर अभिनेता वरुण धवन काही काळ बॉलिवूडपासून दूर होता. आता बॉलिवूडचा सुलतान सलमान खानच्या ‘जुडवा’ या चित्रपटाच्या रिमेकमधून तो पुन्हा कमबॅक करतोय. यापूर्वीच वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाची  घोषणा केली होती. वरुणसोबत या चित्रपटामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नूसुद्धा झळकणार आहेत.

१९९७ ला प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शनसुद्धा डेविड धवन यांनीच केले होते. त्यामुळे येत्या काळात ‘जुडवा २’ या चित्रपटामध्ये वरुण धवन सलमान खानची भूमिका वठवू शकेल का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. ‘जुडवा ’ या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खान, अभिनेत्री रंभा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्यामुळे नाही म्हटले तरीही वरुणसमोर हे एक प्रकारचे आव्हान आहे असेच म्हणावे लागेल. याआधी वरुणने त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शनात ‘मै तेरा हिरो’ या चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत झळकणारी जॅकलिन फर्नांडिस याआधी ‘ढिशूम’ या चित्रपटात वरुणसोबत दिसली होती. तर अभिनेत्री तापसी पन्नूही तिच्या ‘पिंक’ या चित्रपटातील अभिनयामुळे प्रकाशझोतात आली आहे. जॅकलिन या चित्रपटाशिवाय सुशांतसिंग राजपुतबरोबरही ती एक चित्रपट करणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगली आहे.

या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सोमवार पासून गणपतीच्या गाण्याने सुरुवात झाली. सलमानच्या चित्रपटातील ‘टन टना टन …’आणि ‘ऊची है बिल्डिंग’ ही दोन गाणी चित्रपटात असणार असल्याचे डेविड यांनी स्पष्ट केले आहे.’जुडवा’ या चित्रपटामधील या गाण्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. प्रेक्षकांनी अक्षरश: या गाण्यांना डोक्यावर घतले होते. ही गाणी प्रेक्षकांना सलमानची आठवण करुन देणार की वरुण आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यास पात्र ठरणार हे पाहणे देखील औत्सुकतेचे ठरणार आहे. आपल्या मुलाच्या चित्रपटामध्ये ट्विस्ट आणण्यासाठी या पहिल्या चित्रपटातील अर्थात जुडवामधील जोडी म्हणजेच सलमान खान आणि करिश्मा पाहुण्या कलाकाराच्या रुपात दिसणार अल्याची देखील चर्चा आहे.